नांदेड दि. 22 :- नांदेड येथील श्री गुरूगोविंदसिंघजी स्टेडियम मधील ग्राउंड कमालीचे नम्र झाले आहे. तीन दिवस आता दृष्टिहीन क्रिकेटपटूंना मनसोक्त खेळता यावे यासाठी की काय इथले सारे वातावरण भारावलेले आहे. एकमेकांना आधार देऊन धावपट्टीवरील दोन्ही बाजूच्या यष्ट्या आणि धावपट्टी बॉलमधील छऱ्यांच्या आवाजाने भान हरपून गेली आहेत. एष्टीवर डावखुरा फलंदाज आहे. एष्टी रक्षक “इकडे..इकडे…इकडे…” म्हणून गोलंदाजाला दिशा यावी म्हणून आवाज देत आहे. फलंदाज डावखुरा आहे असा सावध इशारा तो देत आहे. त्याचेही कान सतर्क होऊन तो बॉलच्या दिशेने पाहत आहे !
या वातावरणाला निमित्त ठरले आहे क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने आयोजित अंधाच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा. या तीन दिवसीय स्पर्धेसाठी नागपूर, वर्धा, मुंबई, नाशिक, धुळे, जळगाव, सोलापूर, रत्नागिरी, नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ आदी ठिकाणाहून अंध क्रिकेटपटू सहभागी झाले आहे. क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र व मराठवाडा स्पोर्ट कॉन्सील फॉर द नांदेड या संस्थेच्यावतीने अंधाच्या या क्रिकेट स्पर्धेद्वारे खेळाडूंची निवड केली जाणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष पंकज चौधरी यांनी दिली. या स्पर्धेत शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू जयदिप सिंग व इतर एशियन स्पर्धा खेळलेले खेळाडू सहभागी झाले आहेत.
भावांनो कठोर परिश्रमाशिवाय मार्ग नाही
- छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता जयदिप सिंग
लहानपनापासूनच मला खेळाची आवड होती. मी खेळाकडे जास्त वळलो व मला शाळेनेही विश्वास देऊन खेळाकडे वळविले. माझ्या शिक्षकांनी मला दृष्टी कमी आहे म्हणून कधी मनात उणीव निर्माण होऊ दिली नाही. आपण विश्वासावर उभा राहतो. विश्वासाने चालण्यासाठी, खेळण्यासाठी कठोर परिश्रमाची, कष्ट घेण्याची तयारी असली पाहिजे. भावांनो कठोर परिश्रमाची तयारी ठेवा व शिक्षणासमवेत काही कौशल्य अंगी रुजवून घ्या, असा भावनिक सल्ला छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता जयदिप सिंग यांनी दिला. मुंबई येथेच जन्मलेल्या आणि वाढलेल्या जयदिपने अंतरराष्ट्रीय पातळीवर ज्युदो स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. अनेक राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय स्पर्धेतील त्याच्या या चमकदार यशाबद्दल महाराष्ट्र शासनाने त्याचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. क्रिकेड स्पर्धेतील निवड चाचणीसाठी जयदिप ही स्पर्धा खेळत आहे. त्याच्यासमवेत नागेश करंडक राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत 5 वेळा खेळलेल्या नागपूर येथील प्रविण करलोके या क्रीडापटूचाही नांदेड येथील स्पर्धेत सहभाग आहे.
स्पर्धकांची बी-1 ते बी-3 असते वर्गवारी
आपल्या क्रिकेट स्पर्धा सारखेच अंधांच्या क्रिकेट स्पर्धाचे नियम असतात. फक्त फरक एवढाच असतो तो म्हणजे चेंडू जमिनीलाच टाकून फेकायचा. फलंदाजांना दृष्टि नसल्यामुळे त्यांना चेंडू नेमका कुठे आहे याचा अंदाज येण्यासाठी त्यात छर्रे टाकले जातात. प्रत्येक संघात 11 खेळाडू असतात. सर्व अंध. परंतू यात वर्गवारी केली गेली आहे. पूर्णत: दृष्टि नसणारे चार खेळाडू यांना बी-1 म्हटले जाते. तीन मीटर पर्यंत ज्यांना अंधूक दृष्टि आहे त्यांना बी-2 म्हटले जाते. बी-2 वर्गवारीतील तीन खेळाडू असतात तर ज्यांना 6 मीटर पर्यंतच दृष्टि आहे असा खेळाडूंना बी-3 वर्गवारीत गणल्या जाते, असे 4 खेळाडू संघात असतात. बी-1 (पूर्णत: अंध) फलंदाजासाठी धावपटू दिले जातात. एकुण 14 खेळाडूंपैकी प्रत्यक्ष 11 खेळाडूंना खेळविले जाते. या क्रिकेट स्पर्धा यशस्वी होण्यासाठी डॉ माधव गोरे, गणेश काळे, सोमेश मोतेवार, प्रशांत गवंडगावे, गणेश दातावार, दिगंबर लाभसेटवार, राजू मोतेवार, दादाभाऊ खुटे आदी परिश्रम घेत आहेत.
# सत्यप्रभा न्यूज #नांदेड