नांदेड दि.१० जुलै : महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा बोलता आली पाहिजे. त्यांचा व्यवहार मराठीतून झाला पाहिजे आणि मराठी अस्मिता कायम जपली पाहिजे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब हे सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत . हीच भूमिका नांदेड जिल्ह्यातील मनसेकडून घेतली जात असून भविष्यात ज्यांच्या शासकीय , निमशासकीय कार्यालयावर आणि खाजगी दुकानावर मराठी पाट्या नसतील त्या प्रत्येकाला मनसे आपल्या खळखट्याक स्टाईलने आंदोलन उत्तर देईल आणि निर्माण होणाऱ्या परिस्थितीला ते स्वतः जबाबदार असतील असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष विनोद पावडे यांनी दिला आहे . ते आज माध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीची करण्याचा राज्य सरकारचा निर्णय हाणून पाडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष तथा मराठी अस्मितेचे रक्षक राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. राज ठाकरेंच्या दणक्यासमोर राज्य सरकारने गुडघे टेकत हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला . त्यानंतर राज ठाकरे साहेबांच्या पुढाकारातून मुंबईमध्ये भव्य असा विजय मराठीचा जल्लोष मराठीचा हा मेळावा घेण्यात आला . या मेळाव्यातही राज ठाकरे यांची सिंहगर्जना मराठीच्या अस्मितेसाठी आणि मराठी माणसाच्या भल्यासाठी होती . हीच भूमिका संबंध महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राहिलेली आहे . राहणार आहे. ठाणे येथे मराठी भाषा रक्षणासाठी काढलेल्या मराठी माणसाच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली . मोर्चेकऱ्यांना पोलीस ठाण्यात डांबण्यात आले . या दुर्दैवी घटनेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना कठोर शब्दात निषेध व्यक्त करते. शिवाय मराठीला बाधा पोहोचवणाऱ्या प्रत्येकाला मनसे आगामी काळातही खळखट्याक स्टाईलने धडा शिकवेल. याची प्रचिती येत्या काही दिवसात नांदेड जिल्ह्यात निश्चितपणे येईल. ज्यांच्या दुकानावर इंग्रजी अथवा अन्य भाषेतून पाट्या लावण्यात आल्या आहेत त्यांनी त्वरित आपल्या दुकानाच्या , कार्यालयाच्या पाट्या मराठीतून करून घ्याव्यात अन्यथा त्यानंतर होणाऱ्या आंदोलनाला त्यांना सामोरे जावे लागेल आणि निर्माण होणाऱ्या परिस्थितीला ते स्वतः जबाबदार असतील असा इशाराच विनोद पावडे यांनी दिला आहे.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!