नांदेड, दि. ३ ऑक्टोबर: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलातर्फे विद्यार्थ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर साकारलेले “ज्ञानतीर्थ वार्ता” हे अनियतकालिक स्वामी रामानंद तीर्थ यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त प्रकाशित करण्यात आले.
मुख्य प्रशासकीय इमारतीतील स्वागत कक्षात झालेल्या प्रकाशन सोहळ्यात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, यांच्या हस्ते या अंकाचे विमोचन झाले.
या अंकाच्या संपादक मंडळात नागेश गायकवाड, भीमराव नवसागरे, अनंत कुलकर्णी, ज्ञानेश्वर देगावे व विक्रांत हाटकर यांचा समावेश आहे. कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नाचे कौतुक करताना, “विद्यार्थ्यांची ही सृजनशीलता व कल्पकता पत्रकारिता व साहित्य क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरेल. “ज्ञानतीर्थ वार्ता” हा पीडीएफ अंक केवळ घटनांची नोंद न करता विद्यार्थ्यांच्या चिंतनाला आणि सृजनशीलतेला व्यासपीठ देणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक श्री. हुशारसिंग साबळे, वित्त व लेखाधिकारी डॉ. पराग भालचंद्र, अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, डॉ. डी. एम. खंदारे, डॉ. शैलेश वाढेर, उपकुलसचिव डॉ. रवी सरोदे, श्री रामदास पेदेवाड, डॉ. मारोती गायकवाड, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, इंजि.अरुण धाकडे, संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर, प्रा. डॉ. सुहास पाठक, डॉ. सचिन नरंगले, डॉ. कैलाश यादव, श्री. गिरिश जोंधळे तसेच प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.