नायगाव दि.३ नोव्हेंबर :
नायगाव तालुक्यातील शासकीय कार्यालयांच्या शिस्तीचा बोजवारा उडाल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलं आहे. नागरिकांमध्ये “आओ-जाओ, घर तुम्हारा” अशीच चर्चा सुरू असताना, जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांची बेफिकीरी उघड झाली आहे.
प्रभारी उपअभियंता डी. आय. होनराव यांच्या कार्यालयातच सेवक ठाकूर दुपारच्या वेळी साहेबांच्या टेबलावर झोपलेले दिसले. या घटनेमुळे “हे सरकारी कार्यालय आहे की कोणाचं वैयक्तिक घर?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना वारंवार त्रास सहन करावा लागतो. तक्रार केली तरी तिची दखल घेतली जात नाही, उलट बेजबाबदार कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचं संरक्षण मिळतं, अशी नाराजी व्यक्त होत आहे.
या संदर्भात विचारणा केल्यावर प्रभारी उपअभियंता डी. आय. होनराव यांनी सांगितले की, “सेवक ठाकूर यांची तब्येत ठीक नसल्याने ते आराम करत होते. आमच्याकडे एकच कर्मचारी आहे,” अशी सफाई त्यांनी दिली.
दरम्यान, शासकीय कार्यालयातील या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, जबाबदार अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून शिस्त प्रस्थापित करण्याची मागणी केली जात आहे.
			











