हदगाव प्रतिनिधी | तुषार कांबळे | हदगाव पंचायत समितीतील अनेक अधिकारी आणि कर्मचारी मुख्यालयी न राहता आपल्या सोयीनुसार वास्तव्यास असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ( Hadgaon News ) शासन गावापासून ते दिल्लीपर्यंत प्रत्येक योजनेसाठी लाखो रुपये खर्च करून अधिकारी-कर्मचारी नेमते, मात्र हेच अधिकारी मुख्यालयात नसल्याने योजनांची अंमलबजावणी कागदावरच मर्यादित राहते.
प्रत्येक गावातील विकासाचा कणा मानला जाणारा ग्रामसेवक हा प्रशासनातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. त्याला मुख्यालयी राहणे बंधनकारक असूनही अनेक ग्रामसेवक एकाच वेळी अनेक गावांचा कारभार पाहत आहेत. “मी मिटिंगला आहे”, “दुसऱ्या गावात आहे” अशी कारणे देत हे अधिकारी वेळ काढत असून, नागरिकांच्या मूलभूत कामांकडे दुर्लक्ष करत आहेत.
ग्रामपंचायतीच्या कामांवर राजकीय गटबाजीचे ग्रहण पडल्याने विकासकामांचा दर्जा खालावला आहे. “विकास फक्त कागदावर दिसतो” अशी जनतेची भावना असून, सर्वसामान्यांना आपले काम करून घेण्यासाठी ‘वशिला’ लावण्याची वेळ येते. हदगाव पंचायत समितीच्या कार्यालयात गटविकास अधिकारी, बांधकाम व आस्थापना विभाग, कृषी, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, महिला व बालविकास, रोहयो अशा महत्त्वाच्या विभागांचे कर्मचारी अनेकदा गैरहजर आढळतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार कागदपत्रांसाठी फिरत असताना, अधिकारी मात्र आपल्या सोयीने अनुपस्थित राहतात.
या परिस्थितीमुळे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मेघना कावली यांनी तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे. त्यांनी अचानक भेट देऊन वास्तव परिस्थितीची पाहणी केल्यास अधिकारी-कर्मचार्यांचा शिस्तभंग उघड होईल, अशी जनतेची मागणी आहे. हदगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये “ग्रामसेवक, विस्तार अधिकारी कोण आहे?” हा प्रश्नच लोक विचारत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना आज कर्तव्यदक्ष व सक्रिय प्रशासनाची प्रतीक्षा आहे, आणि सीईओ मेघना कावली यांनी अचानक भेट देऊन कारवाई करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.