नांदेड दि.६ नोव्हेंबर :- नांदेड जिल्हयातील देगलूर, भोकर, धर्माबाद, किनवट, उमरी, हदगांव, मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी, मुदखेड, लोहा, नगरपरिषदांसह, हिमायतनगर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे या नगरपरिषद/नगरपंचायतीच्या संपूर्ण क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होईल यांची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.
जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे बैठक संपन्न झाली. यावेळी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा सहआयुक्त गंगाधर इरलोड सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व नगरपरिषद/नगरपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व नगरपरिषद/नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांची उपस्थिती होती.
राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र् राज्य यांचे आदेशान्वये नांदेड जिल्ह्यातील या नगरपरिषद/नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्ह्यातील १२ नगरपरिषद/ एका नगरपंचायतीच्या् संपूर्ण क्षेत्रात तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता काळात सबंधित नगरपरिषद / नगरपंचायत क्षेत्रात असलेले सर्व बॅनर्स, पोस्टर्स, झेंडे काढून टाकण्याचे, भींतीवरील राजकीय मजकुर पुसून टाकण्याचे व राजकीय पक्षाचे बोर्ड काढून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मुख्याधिकारी यांना दिले. तसेच मतदार यादीतील दुबार-तिबार मतदाराबाबत आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार कटाक्षाने कार्यवाही करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
कायदा व सुव्यवस्था पोलीस अधीक्षक व सर्व पोलीस उपविभागीय अधिकारी यांना नगरपरिषद/नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक कालावधीत संबंधित शहरासह संपूर्ण जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील. कोठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याचे जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी सूचित केले. कायदा व सुव्यवस्थेबाबत आदर्श आचासंहितेचे उल्लंघन होणार नाही आणि आदर्श आचारसंहितेची प्रभावी अमंलबजावणी होईल याचीही दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी या कार्यालयाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या नगरपरिषद / नगरंपचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांच्या अनुषंगाने आयोगाचे वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार निवडणूक विषयक कामकाज विहित वेळेत पार पाडण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व संबंधिताना दिल्या. ही निवडणूक लोकशाहीचे मूल्य जोपासून निष्पक्ष, निर्भय व शांत वातावरणात पार पडेल, याची सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!













