हदगाव प्रतिनिधी | तुषार कांबळे | नगरपालिकेच्या निवडणुकीला रंग चढण्याआधीच काँग्रेसकडून सत्ताधा-यांवर जोरदार टीका करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते सुनील सोनुले (Sunil Sonule) यांनी पत्रकारांशी बोलताना महायुतीच्या सत्ताधा-यांवर गंभीर आरोप करत, “निवडणुकीपूर्वी जनतेमध्ये दिशाभूल करण्याचे आणि आमिष दाखवून मतदारांना फसविण्याचे डावपेच सुरू आहेत,” असा आरोप केला. (Hadgaon News)
त्यांच्या म्हणण्यानुसार, काही प्रभागांमध्ये सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते मतदारांना विविध आश्वासने देत फिरत आहेत. “आम्ही तुमच्या भागात रस्ता बांधू, मंदिराला निधी देऊ, घरकुल मंजूर करू, प्लॉट लावून देऊ, अशी खोटी आश्वासने देत जनतेला भ्रमित केले जात आहे. अशा खोट्या गोड बोलांनी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सत्ताधारी गटांकडून सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. “विकासाचे आमिष दाखवून मत मिळविण्याची ही नीती लोकशाहीच्या तत्त्वांना धक्का देणारी आहे. जनतेने विकासाच्या नावाखाली फसविणा-या नेत्यांना ओळखले पाहिजे. निवडणूक आयोगाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सत्ताधा-यांच्या अशा हालचालींवर त्वरित कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेस नेत्यांच्या या आरोपांमुळे हदगाव नगरपालिकेच्या निवडणुकीचा राजकीय रंग अधिक गडद झाला आहे. निवडणुकीपूर्वीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमकीला सुरुवात झाली असून, पुढील काही दिवसांत ही निवडणूक अधिक तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे.