रस्ता सुरक्षेविषयी माहूर येथे मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न
नांदेड दि. १८: प्रादेशिक परिवहन विभागामार्फत रस्ता सुरक्षा अभियान २०२४ दिनांक १५ जानेवारी ते १४फेब्रुवारी २०२४या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने १७ जानेवारी रोजी नांदेड जिल्ह्यातील कृषी मालाची व ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर /ट्रेलर तसेच कचरा वाहतुक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टव टेप लावण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.
या उपक्रमांतर्गत कुंटूरकर शुगर्स लि. येथील ७० ट्रॅक्टर व ट्रेलर तसेच शहर व परिसरातील ३० कचरा वाहतुक करणारी वाहने व इतर ४० मालवाहू व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टीव टेप लावण्यात आले. या कार्यक्रमास मोटार वाहन निरीक्षक गणेश तपकीरे, मंजुषा भोसले, सहायक मोटार वाहन निरीक्षक चेतन अडकटलवार, नंदकुमार सावंत व आशिष जाधव यांनी परिश्रम घेतले.
तसेच रस्ता सुरक्षा अभियान-२०२४ अंतर्गत श्रीक्षेत्र माहूर येथील श्री जगदंबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे रस्ता सुरक्षाविषयी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक व शिक्षक आणि उपस्थित नागरिकांना वॉक ऑन राईट, अपघात होवू नये यासाठी व अपघात झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गुड सेमिरीटन व हेल्मेटयुक्त, अपघातमुक्त गाव संकल्पनांची उपस्थितांना ओळख देण्यात आली. विद्यार्थ्यांना व नागरिकांना रस्ता सुरक्षेबाबतची माहितीपुस्तिका व साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी असे एकूण २८० ते ३०० नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, सहायक मोटार निरीक्षक सचिन मगरे, निलेश ठाकूर यांनी परिश्रम घेतले. तसेच उपस्थित नागरिकांना /वाहनचालकांना रस्ता सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड













