नांदेड दि .१४: ही निवडणूक म्हणजे दोन विचारधारांची लढाई असून काँग्रेस हा धर्मनिरपेक्षपणे काम करणारा पक्ष आहे. तर विरोधी पक्ष हा जाती-धर्मावर आधारित काम करणारा असल्यामुळे ते आरएसएससोबत बंद खोलीत चर्चा करून संविधान नष्ट करण्याचे षडयंत्र रचत आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे कर्जमाफ न करणारे उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज माफ करीत असल्याचा आरोप करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांसोबत राहण्याचे आवाहन लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी यांनी केले.
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व महाविकास आघाडीचे ९ मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारानिमित्त नवा मोंढा येथील मैदानात आयोजित सभेत राहुल गांधी वोलत होते. ते म्हणाले, माझ्या हातातील संविधान पाहून पंतप्रधान मोदींना यात काय आहे हे माहित नसावे. महात्मा गांधी, बिरसा मुंडा, भगवान बुद्ध यांच्यासह अन्य महात्म्यांचा आवाज या संविधानामध्ये आहे. त्यामुळे याचे रक्षण केवळ आमचेच कार्यकर्ता करतात. अशा संविधानाला नष्ट करण्याचे षडयंत्र जर आपण बंद खोलीत करीत असाल तर जनता शांत बसणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ लाख उद्योगपतींचे कर्ज माफ केले आहे. परंतु शेतकरी व गरिबांचा पैशातूनच हे केले गेले. याचा थेट लाभ उद्योगपतींना मिळाला असून त्यापैकी एक म्हणजे गौतम अदानी आहेत. अशा उद्योगपतींना राजकीय बैठकांना का निमंत्रित केले जाते?
कारण त्यांना मुंबईच्या धारावी या झोपडपट्टी भागातील जमीन हवी होती. गरीवांना झोपड्या काढून यांना तेथे काय करायचे आहे हे त्यांनी सांगितले पाहिजे. या संविधानामुळे गरिबांचे रक्षण होत असताना त्याच संविधानाला संपुष्टात आणण्याचे काम याच मोदींनी केले आहे. जेव्हा जेव्हा पंतप्रधान मोदी यांनी भाषण केले तेव्हा तेव्हा त्यांनी द्वेष वाढविण्यावर भर दिला आहे. यामुळे आपआपसातील द्वेष वाढवून संविधानाला संपविण्याचे पाप यांच्याकडून होत आले आहे. मणिपूरमध्ये काय झाले हे आपण पाहिले आहे. धर्मा-धर्मात वाद वाढवून या सरकारने वेरोजगारी वाढवली आहे. तसेच महागाईही वाढली आहे. केवळ अदानीसारख्या उद्योगपतींचे धन वाढविण्यावर या सरकारने भर दिला आहे. याच उद्योगपतींना विमानतळ दिले, जमीन दिली. परंतु यामुळे नुकसान मात्र गरिवांचे झाले आहे हे मात्र त्यांनी सांगितले नाही, ते मी तुम्हाला
सांगतो. उद्योगपतींना थारा दिल्यामुळे जवळपास १ लाख कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे. त्यातील ७० हजार कोटी रुपये अदानींला दिले गेले आहेत. अशा भारतीय जनता पक्षाच्या जातीयवादी धोरणामुळे मी नेहमीच त्यांना जातीवर आधारित जनगणना करण्याची मागणी केली आहे. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. देशातील बहुतांश कंपन्यांमध्ये मागासवर्गीय व दलितांना स्थान नाही. हे केवळ बोलत नाही तर मी प्रत्यक्ष जाऊन तेथील कार्यरत कर्मचाऱ्यांची यादी तपासली त्यात मला दलित व आदिवासींना स्थान दिलेले आढळले नाही, असे सांगून राहुल गांधी यांनी जातीनिहाय प्रमाणावर लाभ द्यावा, अशी मागणी केली.
तसेच महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातकडे पळवल्याप्रकरणांचा खरपूस समाचार घेतला. महाविकास आघाडीने पुढील काळात महिलांना ३ हजार रुपये महिना, मोफत बससेवा, शेतकऱ्यांचे ३ लाखापर्यंत कर्जमाफी, शेतमालाला भाव, जातीय जनगणना, ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवू, युवकांना महिन्याला ४ हजार, २५ लाखापर्यंत विमा आदी योजना राबविण्याचा निर्धार केला. यासाठी महाविकास आघाडी उमेदवारांच्या पाठिशी राहण्याचे आवाहनही लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केले.
या सभेला काँग्रेसचे राज्य अध्यक्ष रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सूर्यकांता पाटील, माधवराव किन्हाळकर, वी.आर. कदम तसेच महाविकास घटक पक्षाचे उमेदवार अब्दुल सत्तार, मोहन हंबर्डे, नायगावचे डॉ. मीनल खतगावकर, भोकरचे तिरुपती कोढकर, हदगावचे आ. माधवराव पा. जवळगावकर, देगलूरचे निवृत्ती कांबळे, मुखेडचे हनमंत पा. बेटमोगरेकर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
चौकट
सभेनंतर राहुल गांधी थेट बस स्थानकात
राहुल गांधी यांनी आपला मूळ लोकांमध्ये जाण्याचा स्वभाव आणि त्यानुसार कृती करत सभेनंतर ते थेट बस स्थानकात पोहोचले व तिथे उपस्थित हजारो लोकांमध्ये अगदी सहजरीत्या मिसळून गेले त्यासोबतच त्यांनी रसवंतीवर रसही पिला व वृद्ध तसेच मुलींशी संवाद साधला या त्यांच्या बिंदासकृतीमुळे पण नांदेडकरांच्या मनामध्ये त्यांनी आपलं सन्मानाचं स्थान अगदी मजबूत केलं
#सत्यप्रभा न्यूज #नांदेड