नांदेड दि.३: येथील विजय नगर भागातील महात्मा फुले प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या परिसरात उघड्या अवस्थेत असलेला डी.पी. ट्रान्सफॉर्मर विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण करत आहे. शाळेच्या जवळच असलेल्या या डी.पी. ट्रान्सफॉर्मरला संरक्षणासाठी कोणताही दरवाजा नाही. शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने या परिसरात वावरत असतात, त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक नागरिकांनी आणि पालकांनी यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी महावितरणकडे याबाबत तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. “लहान मुलांच्या सुरक्षेसाठी डी.पी. ट्रान्सफॉर्मर बंदिस्त करून योग्य सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा अनर्थ घडल्यास त्याला जबाबदार कोण?” असा प्रश्न पालक विचारत आहेत.
शाळेच्या प्रशासनाने देखील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी चिंता व्यक्त केली आहे. “आम्ही यासंदर्भात महावितरणकडे तक्रार केली आहे. त्वरित उपाययोजना न केल्यास पुढे होणाऱ्या अपघातासाठी जबाबदार कोण ठरणार?” असे प्रश्न प्रशासनाने उपस्थित केले आहेत.
डि.पी. च्या सुरक्षा कव्हरसाठी महावितरणकडे मागणी
महावितरणने यावर त्वरेने कारवाई करत डी.पी. ट्रान्सफॉर्मरला दरवाजा बसवून सुरक्षिततेची खात्री द्यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. पालकांनी व शाळेने यासंदर्भात लेखी तक्रार दाखल करण्याचे नियोजन केले आहे. याशिवाय, स्थानिक लोकप्रतिनिधींकडेही हा मुद्दा नेण्यात येणार आहे.
सुरक्षेची जबाबदारी महावितरणची
विद्यार्थ्यांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवण्यासाठी महावितरणने तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा भविष्यात होणाऱ्या संभाव्य दुर्घटनेसाठी महावितरणला जबाबदार धरले जाईल, असा इशाराही पालकांनी दिला आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड













