तीन लाख रुपयांच्या बक्षिसास पात्र
ता. प्र. दत्तात्रय सज्जन
धर्माबाद दि.७: राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे म्हणून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान गतवर्षीपासून राज्यभर राबविण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत शासनाच्या सर्व निकषांची यशस्वी पूर्तता करणाऱ्या धर्माबाद येथील विस्डम कन्सेप स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला असून तब्बल तीन लाख रुपयांच्या बक्षीस पात्र ठरली आहे.
धर्माबाद तालुक्यातील उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या विस्डम शाळेने नेहमीच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक आणि मानसिक विकासाला प्राधान्य दिले आहे. याचाच भाग म्हणून अभ्यासक्रमाची गुणवत्ता राखण्यासाठी राज्य शासनाने निर्मित केलेल्या अभ्यासक्रमासोबतच शहरी विद्यार्थ्यांच्या बरोबरीने ज्ञान आणि कौशल्य विकसित करून येणाऱ्या स्पर्धेसाठी आपलेही विद्यार्थी सक्षम बनावेत यासाठी सीबीएससी अभ्यासक्रमासह ओलिंपियाड आणि आयआयटीचे पायाभूत अभ्यासक्रम इत्यादी सर्वांचा सुरेख संगम साधत विस्डम शाळेने स्वतःचे असे विशेष अभ्यासक्रम कार्यान्वित केले आहे. या कृतीशील अभ्यासक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अनुभवी तसेच प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र तज्ञ शिक्षकांची नियुक्ती केली आहे. वरील गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रमाची फलश्रुती म्हणून मागील सलग पाच वर्षे इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा तसेच पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय, ओलिंपियाड, होमी बाबा, एम टी एस सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादित केले आहे. यासोबतच तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सक्रिय सहभाग नोंदवत विशेष अशी पारितोषिके प्राप्त केली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात खेळांचेही महत्त्व ओळखून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे विविध प्रकारांचे खेळ साहित्य उपलब्ध करून देणे याकडेही विस्डम शाळा विशेष लक्ष केंद्रित करते! विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कलागुणांना वाव देता यावे म्हणून दरवर्षी शाळेचे भव्य असे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात येते. यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण करत त्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या ठाई कृतज्ञ राहण्याची प्रेरणा मिळावी यासाठी माता-पिता पूजन दिवस साजरा करण्यात येतो. राज्य तथा केंद्र शासनाने वेळोवेळी सुचवलेले सर्जनशील उपक्रम तसेच विविध सामाजिक उपक्रमात ही शाळा उल्लेखनीय कार्य करीत आहे. भविष्यात उच्च माध्यमिक शिक्षणासोबतच निर्माण झालेल्या जागतिक स्पर्धेत विद्यार्थी अग्रेसर राहावेत व नवीन शैक्षणिक धोरण २०२० चे तंतोतंत पालन करता यावे यासाठी आतापासूनच ही शाळा प्रयत्नशील आहे. यासोबतच सर्व भौतिक सुविधांनी युक्त अशी शाळेची प्रशस्त इमारत, हवेशीर वर्ग खोल्या, बैठक व्यवस्था, बोलक्या भिंती, ग्रंथालय प्रयोगशाळा, डिजिटल क्लासरूम, भव्य क्रीडांगण, तंबाखू मुक्त आणि प्लास्टिक मुक्त शालेय परिसर, कचऱ्याचे सुयोग्य व्यवस्थापन इत्यादी मानके शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवतात.
वरील सर्व बाबींचे आणि निकषांचे प्रत्यक्ष परीक्षण करून मूल्यमापन करण्यासाठी नेमून दिलेल्या समितीच्या सन्माननीय सदस्यांनी प्रथम केंद्र त्यानंतर तालुका आणि शेवटी जिल्हास्तरीय अशा त्रिस्तरीय मूल्यांकन करून दिलेल्या गुणावरून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत विस्डम शाळेला तालुका पातळीवर प्रथम क्रमांक प्राप्त झाले.
सर्व गोष्टींचे अवलोकन करून तालुक्यातील शासकीय अधिकारी आणि विविध पदावर विराजमान मान्यवर ज्यामध्ये प्रामुख्याने तहसीलदार श्रीमती सुरेखा स्वामी, गटविकास अधिकारी प्रफुल तोटेवाट,गटशिक्षणाधिकारी रविशंकर मार्कंडेय, शिक्षण विस्तार अधिकारी जाधव सर, केंद्रप्रमुख प्रदीप भगत सर, शिक्षण विस्तार अधिकारी आबासाहेब उसकेलवार, शिवकुमार पाटील, कदम सर श्रीमंलगे तसेच सर्व स्तरातील अभ्यासू लोकांकडून शाळेचे मुख्याध्यापक औसाजी चंद्रभान जाधव यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांचे आणि सर्व शिक्षक वृंदाचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
#सत्ययप्रभा न्युज #नांदेड