छत्रपती संभाजी नगर | प्रतिनिधी | विजय पाटील | कन्नड : परवानगीविना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बसविल्याप्रकरणी एकूण ६ जणांविरुद्ध शुक्रवारी (२ मे) गुन्हे दाखल झाले आहेत. या घटना कन्नड तालुक्यातील बोरसर बुद्रूक आणि देवळाणा येथे समोर आल्या आहेत.
बोरसर बुद्रूक येथील घटनेची तक्रार ग्रामसेवक जगदिश नागे यांनी देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात दिली आहे. तक्रारीनुसार, बोरसर बुद्रूक ग्रामपंचायत कार्यालयाकडे जाताना त्यांना बौध्द समाज मंदिरासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १० बाय १० चा चबुतरा तयार करून त्यावर अंदाजे ७ फूट उंचीचा पुतळा बसविलेला दिसला. त्यांनी ग्रामपंचायत शिपाई अमोल रुपनार व इतरांसह पाहणी केली.
नागरिकांकडे पुतळे कोणी बसवले या बाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, पुतळा १५ एप्रिल २०२५ च्या मध्यरात्रीनंतर गावातीलच बालचंद नानाजी रंधे, उत्तम कारभारी पवार (दोन्ही रा. बोरसर बुद्रूक) यांनी बसवले आहेत. शासनाची परवानगी न घेता बेकायदेशीररित्या पुतळा बसवल्याने त्यांच्याविरुद्ध देवगाव रंगारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
देवळाणा येथील घटनेची तक्रार ग्रामसेवक साईनाथ जाधव यांनी दिली आहे. सरकारी दवाखान्यासमोर महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे अंदाजे ८ फूट उंचीचे दोन पुतळे चबतरा तयार करून त्यावर बसविलेले दिसले. ग्रामपंचायत शिपाई संतोष सोपान सुरासे व इतरांसह जाऊन पाहणी केली व नागरिकांकडे पुतळे कोणी बसवले याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, हे पुतळे ११ एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर गावातीलच आकाश ज्ञानेश्वर उबाळे, मधुकर कचरू डोळस, शिवाजी आसाराम मालोदे, सोमनाथ लक्ष्मण सोनवणे यांनी बसवले. त्यावरून पोलिसांनी या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
#सत्यप्रभान्यूज # छत्रपतीसंभाजीनगर