छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी | मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरतर्फे (मसिआ) वाळूज(Waluj) येथील अनिल विश्वासराव चव्हाण सभागृहात रविवारी (४ मे) दुपारी ‘संवाद उद्योजकांशी’ या विशेष कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना निमंत्रित केले होते. या वेळी उपमुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचा सल्ला देतानाच, खंडणीखोरांविरोधात कारवाईसाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना “मकोका’ सारखे कठोर कायदे वापरण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
वेळी आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, अभिजीत देशमुख, ‘मसिआ’चे अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘मसिआ’चे अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना अलीकडच्या काळात माहितीच्या अधिकाराचा (RTI) गैरवापर करून, तसेच अन्य मार्गाने मानसिक त्रास देण्याचे प्रमाण वाढले आहे. काही मंडळींनी हे उद्योगांना ब्लॅकमेल करण्याचे साधन बनवले आहे, अशी तक्रार मांडली. त्यावर अजित पवार म्हणाले, की उद्योजकांना त्रास देणाऱ्यांविरोधात शासन कठोर भूमिका घेईल. उपस्थित पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना खंडणीखोरांविरुद्ध “मकोका’सारखे कठोर कायदे वापरण्यास सांगितले. जेणेकरून उद्योजक सुरक्षित वातावरणात व्यवसाय करू शकतील.
राज्यातील औद्योगिक विकासासाठी सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. जे कोणी उद्योजकांना खंडणीसाठी त्रास देतात, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. उद्योजकांनी कोणतीही भीती न ठेवता पोलिसांकडे तक्रार करावी, अशी कठोर भूमिका त्यांनी केली. वाळूज औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या प्रस्तावाबद्दलही त्यांनी सकारात्मकता दर्शवली. शेतकऱ्याला रात्री-अपरात्री पिकाला पाणी देण्यासाठी जावे लागते. अशावेळी त्यांना हिंसक प्राण्यांचे संकट किंवा इतरही समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांना रात्रीऐवजी दिवसा लाइट दिली जाईल, यामुळे शेतकरी रात्री घरी राहू शकेल, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. अजित पवार यांनी मसिआच्या अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२६ या प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या व ८ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होण्याचे आश्वासनही दिले.
मसिआने मांडलेल्या मागण्या…
अर्जुन गायकवाड यांनी उद्योजकांच्या अडचणी आणि मागण्या मांडल्या. यात अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२६ ला शासनाची आर्थिक मदत द्यावी, जीएसटी ट्रीब्यूनल ऑफिस छत्रपती संभाजीनगर येथे स्थापन करावे, पीएसआय अनुदान वितरणात ‘एमएसएमई’साठी राखीव निधी, डीआयसीच्या अनुदानाची वेळेवर अंमलबजावणी, छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्ग आणि एक्स्प्रेस वेशी जोडणी, रिंग रोडने औद्योगिक क्षेत्रांना जोडणी, सीसीटीव्ही सुरक्षाव्यवस्था, विजेचे दर कमी करणे, सोलार रूफटॉपला प्रोत्साहन आणि
खंडणीखोरांविरोधात कठोर कारवाई आदी मागण्यांचा समावेश होता.
या वेळी मसिआ माजी अध्यक्ष भारत मोतिंगे, बालाजी शिंदे, सुनील किर्दक, किरण जगताप, अनिल पाटील, चेतन राऊत, उपाध्यक्ष राहुल मोगले, सहसचिव रमाकांत पुलकुंडवार, वीरेन पाटील, कोषाध्यक्ष सर्जेराव साळुंके, राजेश विधाते, राजेंद्र चौधरी, शरद चोपडे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य दुष्यंत आठवले, अजय गांधी, कुंदन रेड्डी, नितीन तोष्णीवाल, रवी आहेर, मिलिंद कुलकर्णी, सुदीप अडतीया, आनंद पाटील, प्रल्हाद गायकवाड, श्रीधर वेलंगी तसेच मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन गायके यांनी केले. दिलीप चौधरी यांनी आभार मानले. #सत्यप्रभान्यूज #छत्रपतीसंभाजीनगर