दिनांक 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी
दिव्यांग महिलांच्या वतीने राखी बांधून आंदोलन.
नांदेड दि.७ ऑगस्ट :
मागील बऱ्याच दिवसांपासून दिव्यांगांच्या कल्याण व पुनर्वसनासाठी दरवर्षी येणारा केंद्र व राज्य शासनाकडील दिव्यांगांचा एम्पीलैड्स मधील व आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गतचा ३० लाख रुपये निधी आमदार व खासदारांनी खर्च न करता आपल्याच खिशात घातला व मतदारसंघातील दिव्यांगांवर अन्याय केला आहे याचाच जाब विचारण्यासाठी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने दिनांक १५ जुन पासून आमदार खासदार यांच्या घरावर अर्धनग्न अवस्थेत देशभक्ती गीत लाऊन भीक मागो आंदोलन सुरू केले आहे. यापुर्वी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, आमदार श्रीजया चव्हाण, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार हेमंत पाटील, खासदार डॉ.अजित गोपछडे, खासदार प्रा.रविंद्र चव्हाण आणि आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानावर अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन करण्यात आलेले आहे. आता पुढील सहावा टप्पा दिनांक ९ ऑगस्ट २०२५ रोजी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंद तिडके बोंढारकर यांच्या बोंढार येथील घरावर काढून मतदार संघातील ३० दिव्यांग महिलेच्या वतीने त्यांना राखी बांधून आमदार दादा आता तरी जागे हो तीस लाख रुपये आमच्यासाठी खर्च कर असे नारे देत भव्य मोर्चा काढणार असल्याचे सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी प्रसारमाध्यमांशी आज सांगितले आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने दिव्यांगांना समाजामध्ये चांगले स्थान मिळावं त्यांना जगण्याचं बळ मिळावं त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा ज्यांना पाय नाहीत त्यांना निधीतून पाय मिळावे, ज्यांना हात नाहीत अशांना हाताची मदत व्हावी, ज्यांना बोलता येत नाही ऐकु येत नाही दिसत नाही अशांसाठी आमदार निधितून आवश्यक ती साहित्य उपकरणे उपलब्ध करता यावे या उद्देशाने सरकारच्या वतीने स्थानिक आमदार व खासदारांना वर्षाकाठी 30 लाख रुपये निधी दिला जातो परंतु हा निधी खासदार व आमदार दिव्यांगांच्या भल्यासाठी न खर्च करता स्वतःच्या भल्यासाठीच खर्च करून आपले खिसे भरताना दिसत आहेत. याचा जाब विचारण्यासाठी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने मागील काही दिवसापासून अर्ध नग्न अवस्थेत भिग मागून खासदार आमदारांच्या घरावर मोर्चा काढून निषेध नोंदविणे सुरू केलेले आहे. सहाव्या टप्प्यातील ९ ऑगस्ट २०२५ रोजी नांदेड दक्षिण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आनंद तिडके बोंढरकर यांच्या बोंढार येथील घरावर भिक मागो आंदोलन काढून ढोल बजावत अर्ध नग्न व रक्षाबंधनाची ओवाळणी करत महिलांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. आमदार दादा जागे हो आता तरी दिव्यांगांना निधी देऊन बळ दे, आमदार बोंढारकर दादा एकच वादा 30 लाख निधी यावर्षी आता तरी दे दादा असे म्हणून राखी बांधून भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चा तथा आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे, सय्यद आतिक हुसेन, कार्तिक कुमार भरतिपुरम, सय्यद आरिफ,शेख आलिम,शिवाजी सुर्यवंशी,शेख माजीद,चंपतराव डाकोरे, आदित्य पाटील, प्रेमकुमार वैद्य, मोहम्मद मोहसिन कादरी,राजु इराबत्तीन,
महिला मंडळ अध्यक्षा भाग्यश्री नागेश्वर, कल्पना सकते, अफरोजा खानम,जैनाज शेख,सविता गवते यांच्यासह मुकबधीर -कर्णबधिर-हिमोफिलीया-अंध या सकल दिव्यांग संघटनांनी आज केले आहे.