नांदेड दि.१८ : पावसाळ्याच्या तोंडावरही अनेक गावांमध्ये मूलभूत सुविधा अद्याप उपलब्ध नाहीत, याचे धक्कादायक उदाहरण मुखेड तालुक्यातील तारदडवाडी गावात समोर आले आहे. गावातील एका अंत्यविधीप्रसंगी मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी ग्रामस्थांना नदीच्या पाण्यातून मृतदेह वाहून न्यावा लागला. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप असून प्रशासनाच्या उदासीन कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गावात स्मशानभूमीकडे जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता नाही. पावसाळ्यात नदीला पाणी आल्यामुळे स्मशानभूमीपर्यंत जाण्याचा मार्ग बंद होतो. परिणामी ग्रामस्थांना मृतदेह खांद्यावर उचलून जीव धोक्यात घालून नदी पार करावी लागते. काही वेळा पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने मृतदेहासह जाणाऱ्यांच्या जीवितालाही धोका निर्माण होतो. अलीकडेच झालेल्या घटनेत गावकऱ्यांनी अश्रुपूर्ण डोळ्यांनी मृतदेह नदीच्या पाण्यातून उचलत नेला. हा थरार अंगावर काटा आणणारा होता.
गावकरी सांगतात की, या समस्येबाबत वारंवार प्रशासनाला मागणी केली गेली आहे. पण अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. ग्रामपंचायत स्तरावर प्रस्ताव पाठवले गेले, मात्र पुढे फाईल हलतच नाही. परिणामी प्रत्येक पावसाळ्यात मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांवर दुहेरी आघात होतो. एकीकडे प्रिय व्यक्तीचा मृत्यू सहन करायचा आणि दुसरीकडे अंत्यविधीसाठी जीव धोक्यात घालून नदी पार करायची.
“गावात साधा पुलसुद्धा नाही. प्रत्येक वेळी आम्हाला हा प्रसंग ओढवतो. हे पाहून मन विषण्ण होतं,” असं एका ग्रामस्थाने सांगितलं.
या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये संताप असून त्यांनी शासनाने तातडीने लक्ष घालावे, असा आग्रह धरला आहे. पुल किंवा सुरक्षित रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी वारंवार केली जाते. अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
ही घटना केवळ तारदडवाडीपुरती मर्यादित नाही. मुखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये अशीच समस्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागातील विकासाच्या दाव्यांना ही घटना चपराक मारणारी ठरली आहे.