ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची कार जाळल्याच्या घटनेच्या काही तासानंतर बीड जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ओबीसी आंदोलक नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांचे सहकारी असलेल्या पवन करवर (Pavan Karwar) यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील माजलगावच्या सावरगावमध्ये एका हॉटेलसमोर हा प्रकार घडला आहे. पवन करवर यांच्यावर लाठ्या, काठ्यांनी हल्ला केला असून ते लक्ष्मण हाके यांच्या अत्यंत जवळचे मानले जात आहे. त्यांच्यावर मध्यरात्रीच्या सुमारास हा हल्ला झाल्याची घटना घडलीयं.
प्राथमिक माहितीनुसार पवन करवर जालन्याला एका सभेसाठी जात होते. याचवेळी ते एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी थांबले होते. जेवण संपवून ते बाहेर पडताना हॉटेलमध्ये विजयसिंह पंडित यांचा फोटो पाहून ते उठले आणि निघून जात होते. त्याचवेळी हॉटेलमालक प्रविण जगताप, नितीन जगताप यांनी त्यांना अडवले आणि लाठ्या, काठ्या, रॉडने बेदम मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात आला.
जालन्यात काही दिवसांपूर्वीच नवनाथ वाघमारे यांची गाडी जाळल्याची घटना घडली. या घटनेतील आरोपी विश्वंभर तिरुखे यांना अटक करण्यात आली. तिरुखे मनोज जरांगे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप वाघमारेंकडून करण्यात आला. त्यानंतर आता लक्ष्मण हाके यांच्या सहकाऱ्यावर बीडमध्ये हल्ला झाल्याची घटना घडलीयं. त्यामुळे आता बीडच्या माजलगावमध्ये तणावाची परिस्थिती असून ओबीसी समाजाकडून संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या हल्ल्यानंतर जखमी पवन करवर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी अद्याप लक्ष्मण हाके यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नसून हा हल्ला कशासाठी करण्यात आला. याबद्दलचं कारण अद्याप समोर आलेलं नाही…