पुणे: हत्येच्या प्रकरणातील आरोपी तुरुंगातून निवडणूक अर्ज भरतात, निवडणूक लढवतात… हे चित्र आपण या आधी यूपी-बिहारमध्ये बघत होतो. पण शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यातही आज तेच चित्र पाहायला मिळालं. तोंडावर काळं कापड बांधलेल्या आणि पोलिसांच्या दोरखंडात जखडलेल्या गुंड बंडू आंदेकरने (Bandu Andekar) महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरला. यावेळी त्याने व्हिक्ट्री साईनही दाखवली. ‘नेकी का काम, आंदेकर का नाम’ असं म्हणत बंडू आंदेकरने थेट अर्ज भरण्यासाठी एन्ट्री केली अन् त्याला पाहणाऱ्यांच्या काळजात धडधड झाली. (Bandu Andekar Pune Election)
आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरने पोलीस बंदोबस्तात त्याचा उमेदवारी अर्ज दाखल केला. पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात त्याने अर्ज दाखल केला. आयुष कोमकर हत्या प्रकरणात (Ayush Komkar Muder Case) बंडू आंदेकर सध्या तुरुंगात आहे. बंडू आंदेकरने पुण्यातील प्रभाग क्रमांक 24 मधून अपक्ष अर्ज भरल्याची माहिती आहे.
बंडू आंदेकरला पोलिसांनी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात आणलं. त्यावेळी बंडू आंदेकरने घोषणाबाजी केली. ‘नेकी का काम, आंदेकर का नाम’ अशी घोषणा आंदेकरने दिली. ‘बघा बघा, मला लोकशाहीत कसं आणलंय. आंदेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत. मी उमेदवार आहे, दरोडेखोर नाही. वनराज आंदेकर जिंदाबाद..’ असं बंडू आंदेकर म्हणाला.
Pune Andekar Komkar Gang War : आंदेकर कुटुंबात तिघांनी अर्ज भरला बंडू आंदेकर आणि त्यांच्या कुटुंबातील लक्ष्मी उदयकांत आंदेकर तसेच सोनाली वनराज आंदेकर यांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली होती. मात्र बंडू आंदेकरला उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक, भाषण, घोषणाबाजी करायला कोर्टाने मनाई केली.(Pune Mahanagarpalika Election)
सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर हेदेखील 5 कोटी 40 लाखांच्या खंडणी प्रकरणात जेलमध्ये आहेत. आता यांना प्रचार करताना मात्र नियम पाळावे लागणार आहेत.
Pune Andekar Gang : आंदेकरांना अजितदादांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी? आंदेकर कुटुंबातील सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांचा आयुष कोमकर हत्याकांडाशी थेट संबंध नसल्याचं अजितदादांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी म्हटलं. त्यामुळे या दोघींनाही राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. त्याचवेळी बंडू आंदेकरला राष्ट्रवादी उमेदवारी देणार का याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
पुण्यातील प्रभाग क्रमांक 22, 23 आणि 24 मधून आंदेकर कुटुंबातील हे तिघेही निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे.