सत्यप्रभा न्युज नेटवर्क
विजय पाटील
छत्रपती संभाजी नगर दि २: समर्थनगर येथील विवेकानंद कॉलेजजवळील एसबीआयचे एटीएम गॅस कटरने कापून चोरट्यांनी ८ लाख ८९ हजार ३०० रुपये लुटून नेले. विशेष म्हणजे ही चोरी त्यांनी अत्यंत चाणाक्षपणे केली, आधी सिक्युरिटी यंत्रणा निष्क्रिय केली, नंतर गॅस कटरने एटीएम कापले. त्याआधी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर काळा स्प्रे फवारला. ही घटना रविवारी (१ डिसेंबर) दुपारी दोनच्या सुमारास समोर आली. क्रांती चौक पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
एसबीआयचे डेप्युटी मॅनेजर विकास हुकूमचंद निकाळजे (वय ४०, रा. तिरुपती पार्क, गुरुसहानीनगर, एन ४ सिडको) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. रविवारी दुपारी दोनला ते जटवाडा रोडवरील एव्हरेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असताना त्यांना एटीएममध्ये कॅश भरणारी एजन्सी सीएमएसचे प्रतिनिधी प्रल्हाद चौधरी यांचा कॉल आला. त्यांनी सांगितले, की विवेकानंद कॉलेजच्या गेटच्या बाजूला समर्थनगर रोडवर असलेल्या एटीएमचा दरवाजा पूर्णपणे जळालेला असून, पूर्ण उघडा आहे. आतमध्ये रोकड दिसत नाही. त्यानंतर निकाळजे यांच्यासह एसबीआयचे अधिकारी रवींद्र मोडक व माजिद शेख हेही तातडीने एटीएमकडे आले.
क्रांती चौक पोलिसांनाही कळविण्यात आले. पाहणी केली असता दरवाजाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरा व आतील कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारल्याचे दिसले. एटीएम मशिनची डावी बाजू जळालेली होती. त्याठिकाणी पत्रा नव्हता. रोकडही नव्हती. अधिकाऱ्यांनी या एटीएमचे सॉफ्टवेअर तपासले असता एटीएमशी सॉफ्टवेअरचा संपर्क पहाटे ३ वाजून २३ मिनिटांनी खंडित झाल्याचे समोर आले. चोरट्यांनी ५०० रुपयांच्या ७ लाख ७३ हजार रुपयांच्या नोटा आणि १०० रुपयांच्या १ लाख १६ हजार ३०० रुपयांच्या नोटा अशा एकूण ८ लाख ८९ हजार ३०० रुपयांवर डल्ला मारल्याचे समोर आले. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील माने करत आहेत.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजी नगर
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!