नांदेड दि.११ संष्टेबर :शेतकऱ्यांच्या वेदनांना न्याय मिळवून देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याने अतिशय अनोखा आणि धक्कादायक मार्ग अवलंबला आहे. लक्ष्मीकांत कदम या कार्यकर्त्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले आहे. माहूर तालुक्यातील वायफणी गावचे रहिवासी असलेले कदम यांच्या या कृतीने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे.
कर्जबाजारीपणामुळे राज्यात रोज सरासरी अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. ही परिस्थिती थांबवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना खरी मदत मिळावी यासाठी कर्जमाफीची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यावश्यक असल्याचे कदम यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. “शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखा, कर्जमाफीची अंमलबजावणी तातडीने करा,” असा ठाम संदेश त्यांनी रक्ताने लिहिलेल्या पत्रातून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवला आहे.
लक्ष्मीकांत कदम यांनी प्रत्यक्ष रक्त काढून त्यातूनच पत्र लिहिले. शासन आणि प्रशासनाचे डोळे उघडावेत, शेतकऱ्यांच्या वेदना समजाव्यात आणि त्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी तीव्र अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा ज्वलंत प्रश्न आहे. सततची दुष्काळी परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती, शेतीमालाला हमीभावाचा अभाव, वाढलेले कर्ज आणि शासनाच्या अपुऱ्या मदतीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे जीवन संकटात सापडले असून त्यांच्या कुटुंबीयांवर अंधाराचे सावट आले आहे.
अशा पार्श्वभूमीवर लक्ष्मीकांत कदम यांची ही कृती म्हणजे केवळ आंदोलन नाही तर शासनाला दिलेला एक इशारा आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे आता डोळेझाक करता येणार नाही, असा ठाम संदेश यातून उमटतो. त्यामुळे राज्यभर या घटनेची चर्चा रंगली असून, शासन या प्रकरणाकडे कसे पाहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.













