मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना भाजपने संघटनेत खांदेपालट करत नव्या अध्यक्षांची घोषणा केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत अमित साटम यांची मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून निवड केल्याची माहिती दिली आहे. मुंबई भाजपचे विद्यमान अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी असल्याने पक्षाकडून नव्या अध्यक्षाची निवड करण्यात आली आहे.
अमित साटम यांच्या निवडीविषयी माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आशिष शेलार यांच्याकडे सध्या मंत्रिपदाचा भार आहे. त्यामुळे पक्षाने मुंबईत नव्या अध्यक्षांची निवड केली असून अमित साटम यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कोअर कमिटीच्या सर्व सदस्यांशी आणि वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून अमित साटम यांची निवड केली आहे. साटम हे मागील तीन टर्मपासून आमदार आहेत, नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. तसंच भाजपमध्ये त्यांची प्रदीर्घ वाटचाल राहिली आहे. संघटनात्मक अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. विधानसभेत एक अभ्यासू आणि आक्रमक आमदार अशी त्यांची प्रतिमा आहे. मुंबईच्या प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे,” अशा शब्दांत फडणवीस यांनी नवनियुक्त अध्यक्षांचं कौतुक केलं आहे.