नांदेड, १८ जुलै : राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग पीजी मेडिकल विद्यार्थ्यांसाठी दररोज फक्त आठ तास कामाचा नियम लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवले आहे. समितीचे नांदेड जिल्हाध्यक्ष राहुल सिताराम साळवे यांच्या मते, दिव्यांग पीजी मेडिकल विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीर पद्धतीने अतिप्रचंड काम करून घेतले जात आहे. त्यांनी १९९२ मधील केंद्रीय रेसिडेन्सी योजना (Central Residency Scheme) लागू करण्याची मागणी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास ९ आणि १५ ऑगस्ट २०२५ रोजी नांदेडमध्ये दिव्यांगजन आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असेही साळवे यांनी सांगितले.
उल्लेखनीय बाब म्हणजे, युनायटेड डॉक्टर्स फ्रंटने दिनांक २८.०६.२०२५ रोजी भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत दिव्यांग पीजी मेडिकल विद्यार्थ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या अतिरिक्त ड्युटी तासांमुळे त्यांना होणारी शारीरिक आणि मानसिक त्रास रोखण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाअंतर्गत दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाने दिनांक ०२.०७.२०२५ रोजी एक कार्यालयीन स्मरणपत्र (Office Memorandum) जारी केले आहे. या स्मरणपत्राद्वारे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिवांना दिव्यांग पीजी मेडिकल विद्यार्थ्यांचे हक्क सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात दिव्यांगजन हक्क कायदा २०१६ चा भंग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कायद्यानुसार शैक्षणिक संस्थांवर जबाबदारी आहे की त्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विशेष गरजांचा विचार करून योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देतील. मात्र, जीएमसी नांदेडसह राज्यातील अनेक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दिव्यांग पीजी मेडिकल विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत.
या पार्श्वभूमीवर, जीएमसी नांदेडसह संपूर्ण राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग पीजी विद्यार्थ्यांसाठी विशेष गरजांनुसार सुविधा पुरविणे आणि भारत सरकारच्या १९९२ च्या नियमानुसार आठवड्याला ४८ तास व एकावेळी कमाल १२ तास अशी ड्युटी मर्यादित ठेवणे, अशी मागणी करण्यात आली आहे.
लवकरच नांदेड येथील जीएमसीमध्ये भेट देऊन दिव्यांग मेडिकल विद्यार्थ्यांशी तसेच रुग्णालय प्रशासनाशी संवाद साधण्यात येईल. विद्यार्थ्यांना भीतीमुक्त वातावरणात त्यांचे प्रश्न मांडता येतील, जेणेकरून व्यवस्थेच्या दबावामुळे ते सत्य लपवू शकणार नाहीत असे राहुल साळवे यांनी म्हटले आहे.