पावसाळी स्थितीत विद्युत सुरक्षेला प्राधान्य देण्याचे महावितरणचे आवाहन
नांदेड, दि.२९ : नांदेड सह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली आहे. ढगफुटी सुदृश्य पावसामुळे परिमंडळातील वीज व्यवस्था मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली. सुरक्षेचा भाग म्हणून नांदेड जिल्ह्यासह परिमंडलातील सुमारे २० ते २२ विद्युत उपकेंद्रातून वीजपुरवठा नाईलाजाने खंडित करावा लागला. ७७ लघु व उच्च दाब वाहिन्यावरील पुरवठा बंद राहीला. पर्यायाने ८४ गावे बाधित झाली. तर कंधार, नायगाव, नांदेड ग्रामीण मधील उच्चदाब वाहिन्यावरील विजेचे खांब वाहून गेल्याने तेथील वीजपुरवठा खंडित झाला. बहुतांश उपकेंद्राच्या यार्डात पाणी साचल्याने वीज पुरवठा बंद राहिला. या गंभीर स्थितीत महावितरणचे अधिकारी-कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. शुक्रवारी दुपारपर्यंत आर्ध्यापेक्षा अधिक भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले.
दरम्यान, सरकारी दवाखाने, पाणीपुरवठा वीज योजना, सरकारी कार्यालय, पोलीस ठाणे, शाळा-महाविद्यालय, धार्मिक स्थळे व गर्दीच्या ठिकाणांचा विद्युत पुरवठा प्राधान्यक्रमाने पूर्ववत करण्याच्या सूचना मुख्य अभियंता श्री. राजाराम माने यांनी दिलेल्या आहेत. शिवाय नागरिकांनीही विद्युत सुरक्षेकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
अतिवृष्टीने निर्माण झालेल्या विपरीत परिस्थितीने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर आमदुरा, नांदेड एमआयडीसी, कौठा, चौफाळा, सांगवी, पावडेवाडी, नांदेड ग्रामीण मधील सावरगाव, कुरुळा, कामठा, दाभड, भोकर मधील पळसपुर, देगलूर विभागातील करखेली, जारीकोट असे सुमारे २० ते २२ उपकेंद्रातील ३३ /११ केव्ही उपकेंद्रात पाणी साचल्याने विद्युत पुरवठा खंडित ठेवण्यात आला होता. पाण्याचा निचरा होईल त्याप्रमाणे विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला.
कंधार, नायगाव, देगलूर परिसरातील लेंढी नदी पात्र, रेडगाव जवळा, बंधन, मांजरम गोदाम येथील विजेचे काम पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. बऱ्याच ठिकाणी विद्युत रोहित्र पाण्यात गेल्याने तेथील वीज पुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवावा लागला होता.
पाण्याचा निचरा होईल त्याप्रमाणे वीज पुरवठा सुरळीत करण्यात येत असून त्या कामी विद्युत कर्मचारी- अधिकारी परिश्रम घेत आहेत. नागरिकांनीही पावसाच्या या गंभीर स्थितीत सुरक्षित राहावे. ओल्या भिंती, विद्युत उपकरणांचा काळजीपूर्वक वापर करावा, विद्युत सुरक्षेची काळजी घ्यावी, शेत शिवारातील आपली गुरेढोरे वीज यंत्रणेपासून सुरक्षित अंतरावर बांधावीत, ओल्या हाताने वीज यंत्रणा हाताळू नये आदी स्वरूपाची काळजी घ्यावी. असेही आवाहन महावितरण तर्फे करण्यात येत आहे.