पुणे दि.२५ ऑगस्ट : आगामी गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी पुणे शहर पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
आयुक्तांनी सांगितले की, गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली असून, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ट्रॅफिक पोलीस विभागाने स्वतंत्र आराखडा तयार केला आहे. प्रमुख गणेश मंडळांभोवती सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोनद्वारे देखरेख तसेच गुप्तचर यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे.
त्यांनी स्पष्ट केले की, ढोल-ताशा पथकांच्या वेळेचे काटेकोर पालन, ध्वनीप्रदूषण नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान सुरक्षेची कडक अंमलबजावणी केली जाईल. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, “गणेशोत्सव हा पुण्याची शान आहे. नागरिकांनी नियम पाळून आनंद, उत्साह आणि भक्तिभावाने हा उत्सव साजरा करावा. पोलिस प्रशासनाकडून सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेतली जाईल.”