छत्रपती संभाजी नगर | प्रतिनिधी | गंगापूर | मित्रासोबत मुलीला चॅटिंग करताना पकडल्यानंतर तिचा मोबाइल काढून घेण्यात आला. पण तिच्या त्या मित्रानेच तिला पळवून नेल्याची घटना गंगापूर तालुक्यात समोर आली आहे. गंगापूर पोलिसांनी प्रदिप राजेंद्र तिखे रा. शिंगी ता. गंगापूर याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
गंगापूरजवळील एका गावातील ३९ वर्षीय शेतकऱ्याची मोठी मुलगी १५ वर्षे १० महिने वयाची आहे. तिने दहावीची परीक्षा दिलेली आहे. त्यानंतर घरीच होती. आठ दिवसांपूर्वी मुलीला तिचा मित्र प्रदिप तिखेसोबत मोबाइलवर चॅटिंग करताना पालकांनी पकडले होते. त्यानंतर तिचा मोबाइल काढून घेण्यात आला. बुधवारी (३० एप्रिल) रात्री ९ वाजता जेवण करून कुटुंब झोपी गेले. मोठी मुलगी काका-काकूकडे झोपायला गेली.
रात्री १० ला मुलीचे काका धावत आले, त्यांनी मुलीच्या वडिलांना झोपेतून उठवून सांगितले, की मुलगी आमच्यासोबत झोपलेली होती. ती बेडवर दिसत नाही. तुमच्याकडे आली आहे का… त्यानंतर सर्वांनी मिळून तिला शोधायला सुरुवात केली. ती घरात, गावात व आजूबाजूच्या परिसरात, नातेवाइकांकडेही मिळून आली नाही. सर्व जण प्रदीप तिखे याच्या घरी गेले असता तोही घरी मिळून आला नाही. त्यावरून प्रदीपने मुलीला फूस लावून पळवल्याची तक्रार गंगापूर पोलिसांत मुलीच्या वडिलांनी केली. अधिक तपास पोलीस
उपनिरीक्षक अश्विनी कुंभार करत आहेत.
#सत्यप्रभान्यूज #छत्रपतीसंभाजीनगर













