Gunratan Sadavarte Challenge to Raj Thackeray: महाराष्ट्रात आता पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विरोध केला आहे. राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी मनसे हे खपवून घेणार नसून संघर्ष होईल असा इशारा दिला आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेला वकील गुणरत्न सदावर्ते(Gunratan Sadavarte) यांनी विरोध केला असून, शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरेंनी जाहीर आव्हानही दिलं असून, तुमच्या पाच प्रमुखांची लेकरं मराठी शाळेत शिकलीयेत हे छातीठोकपणे सांगावं असं म्हटलं आहे.
“हिंदू राष्ट्र भारतात छत्रपती शिवरायांचे मावळे, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक वारसदार आणि संविधानप्रेमी नागरिक म्हणून या देशात, राज्यात कधीही भाषिक वाद, जातीच्या आधारावर वाद होऊ न देण्याच्या हेतूने एक जबाबदार नागरिक आणि हिंदुस्तान मजदूर संघ या संघटनेच्या वीतने मी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास आलो होतो. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020, जे धोरण महाराष्ट्र शासनाने 16 एप्रिल 2025 रोजी अंमलात आणण्याचं ठरवलं आणि प्राथमिक शिक्षणापासून हिंदी विषयाला अभ्यासक्रमात आणण्याचा एक मोठा आणि सामान्य कष्टकऱ्यांच्या मुलाला एक अधिकची भाषा शिकण्यासी संधी देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या सरकारने घेतला. त्या निर्णयाची अंमलबजावणी होत असतान राज ठाकरे यांनी आपल्या गलिच्छ राजकारणाखातर, राजकीय फायद्यासाठी भाषिक वाद निर्माण करण्याचा खाट घातला आहे,” असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी तक्रार दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांसी संवाद साधताना केला.
“ट्विट करुन राज ठाकरेंनी शाळा, पुस्तकालयं कशी टार्गेट करावी सांगितलं आहे. हे विदारक आहे. एक भाषा अधिक शिकायला मिळत असताना स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्योत्तर काळात कोणताही राजकारणी कोणीही इतक्या तालिबानी पद्दतीनं वागला नसेल. राज ठाकरेंचं वर्तन दु:खद आहे. राज ठाकरेंना कायदा कळतो की नाही हे उपस्थित करणारं आहे. राज ठाकरेंनी धोरण न वाचता राजकीय पोळी भाजण्यासाठी चालवलेला हा एक प्रयत्न आहे”, असाही दावा त्यांनी केला आहे.
“ज्याप्रकारे राज ठाकरे यांचे कार्यकर्ते, बेकायदा मंडळी एकत्रित होऊन सार्वजनिकपणे शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या अख्त्यारित, शासनाच्या निर्णयाचं दहन केलं आहे ते चुकीचं, बेकायदा आणि असंवैधानिक आहे. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी कायद्याचा भंग करत बॅनर लावले. भाषेवर आधारित लोकांना वर्गीकृत करणं, वाद निर्माण करणं हेतू आहे. हे जातीय तेढ निर्माण करण्याचंही कृत्य आहे. राज ठाकरेंवर एफआयआर दाखल केला पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली आहे.