उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे,राज्य मंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान
विजय घोगसे पाटील
नेवासा दि.२३ संष्टेबर: शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२४-२५ या वर्षीचा अहिल्यानगर जिल्ह्यातून प्राथमिक शिक्षक या संवर्गातून नेवासे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा भालगाव येथील तंत्रस्नेही,उपक्रमशील शिक्षिका शितल झरेकर-आठरे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एनसीपीएच्या टाटा थिएटर मुंबई मध्ये झालेल्या शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर,शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुंबई सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषद सदस्य ज.मो.अभ्यंकर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे , डॉ.मनीषा कायंदे, यांच्यासह शालेय शिक्षण प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिन्द्रप्रताप सिंह, शिक्षण संचालक महेश पालकर आदी मान्यवरांनी झरेकर यांच्यासह राज्यातील 111 शिक्षकांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
प्रस्ताविकामध्ये शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी पुरस्कारांविषयी माहिती देत स्वागत केले.यावेळी अध्यक्ष स्थानी असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शिक्षकांचा सन्मान हा राष्ट्रनिर्मितीचा सन्मान आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते न शिकवता, कौशल्याधारित शिक्षण, समस्यांचे निराकरण, टीमवर्क आणि मूल्याधारित शिक्षण, ज्ञानासोबत सद्गुणांची शिकवणूक देऊन स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण होईल अशी सशक्त पिढी घडवावी. पुरस्कार प्राप्त शिक्षक हे राज्याचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत, असे गौरवोद्गार देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दृश्य प्रणाली द्वारे उपस्थित पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे कौतुक केले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शुभेच्छा संदेशाचे वाचन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे,राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आदींनी आपल्या मनोगतातून पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले.
राज्य शिक्षक पुरस्कार विजेत्या शितल झरेकर-आठरे यांनी मिळालेली पुरस्काराची एक लाख दहा हजार रुपये रक्कम ही दरवर्षी अनाथ व गरजवंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्यांच्या शैक्षणिक साहित्य व शिक्षणासाठी खर्च करणार असल्याचे यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना जाहीर केले आहे.पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षण संचालक महेश पालकर यांनी मांडले
पुरस्काराचे बक्षीस अनाथ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पालकत्वासाठी..
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार विजेत्या शितल झरेकर-आठरे यांनी मिळालेली पुरस्काराची एक लाख दहा हजार रुपये रक्कम ही दरवर्षी अनाथ व गरजवंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्यांच्या शैक्षणिक साहित्य व शिक्षणासाठी खर्च करणार असल्याचे यावेळी जाहीर केले आहे #सत्यप्रभा न्यूज अहिल्यानगर