लातूर, दि. २८ : जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ आणि अहमदपूर तालुक्यांत पूरपरिस्थितीत अडकलेल्या दहा व्यक्तींची स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथक आणि नागरिकांनी यशस्वीपणे सुटका केली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने कारवाई करत पथकाने ही बचाव कार्ये यशस्वीरीत्या पूर्ण केली. खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय सैन्याचे एक पथक लातूरला पाचारण करण्यात आले असून, हे पथक आज रात्री उशिरापर्यंत अहमदपूर येथे दाखल होईल.
शिरूर अनंतपाळ येथे नदीकाठावरील शेडमध्ये अडकलेल्या पाच व्यक्तींना स्थानिक पथकाने सुखरूप बाहेर काढले. अहमदपूर तालुक्यातील मौजे काळेगाव येथील साठवण तलावाच्या सांडव्यावर अडकलेल्या एका व्यक्तीची तातडीने सुटका करण्यात आली.
शिरूर अनंतपाळ येथील घरणी नदीवरील पुलाच्या बांधकामादरम्यान पाण्यात अडकलेल्या तीन मजुरांना स्थानिक पथकाच्या मदतीने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. तसेच, मौजे माकणी येथे गावाजवळील पुलावरून जाताना पाण्यात वाहत गेलेल्या दौलत गोपाळ डोंगरगावे यांना स्थानिक गावकऱ्यांनी वाचवले. त्यांना किरकोळ दुखापती झाल्याने सध्या शिरूर ताजबंद येथील साईकृपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.
Collector & District Magistrate, Latur
Latur Police Department