नांदेड दि.१ जुलै नांदेड शहराचे आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय वैभव असलेली माँ गोदावरी नदी जी दक्षिणगंगा या नावाने ओळखली जाते सध्या प्रदूषणाच्या मोठ्या संकटाला सामोरी जात आहे. नदीतून हजारो किलोमीटरच्या परिसरातील लोकवस्ती आणि शेतीसाठी पाणीपुरवठा होतो, मात्र माणसांच्या हलगर्जीपणामुळे तिच्या पाण्याची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. या गंभीर वास्तवाची जाणीव ठेवत, नांदेडमध्ये मागील ९९ आठवड्यांपासून सुरू असलेल्या माँ गोदावरी स्वच्छता अभियानाचा शंभरावा आठवडा २९ जून २०२५ रोजी महास्वच्छता उपक्रम आयोजित करून उत्साहात साजरा करण्यात आला.
या अभियानाच्या निमित्ताने नद्यांप्रती आपली नैतिक जबाबदारी बजावत नागरिक एकत्र आले आणि स्वच्छतेसोबतच सामाजिक सलोखा, बंधुता व एकतेचे एक अद्वितीय उदाहरण घडवले. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र कलामंदिरच्या भक्तमंडळींच्या पुढाकाराने आणि शहरातील गोदावरीप्रेमी नागरिकांच्या सक्रिय सहभागातून हा उपक्रम अधिक व्यापक झाला.
या विशेष उपक्रमासाठी संत बाबा बलविंदरसिंहजी महाराज (लंगर साहब, नांदेड), अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, संत हरिसिंहजी महाराज, महापालिकेचे स्वच्छता अधिकारी श्री. तडवी, शिक्षण विस्तार अधिकारी रोहिदास बसवदे, डॉ. रमेश नारलावार, गणेश ठाकूर, सुमित मुथा आणि सनतकुमार महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये स्वच्छता आणि पर्यावरण विषयक विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये स्वच्छता घोषवाक्य स्पर्धा, खुली निबंध स्पर्धा आणि “कोण बनेगा माँ गोदावरी का स्वच्छता दूत?” या प्रश्नमंजुषेचा समावेश होता. स्पर्धकांना १८ वर्षांखालील आणि १८ वर्षांवरील गटांमध्ये विभागण्यात आले होते. दोन्ही गटांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
उपक्रमादरम्यान शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या सदस्यांचा आणि पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मानही करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. संजय शर्मा यांनी केले, तर प्रश्नमंजुषेचे संचालन प्रल्हाद घोरबांड गुरुजी यांनी केले. या प्रसंगी श्री केंद्रे पी. एस. यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपस्थितांनी गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्याची शपथ घेतली. आभारप्रदर्शन प्रीतम भराडिया यांनी केले.
उपस्थित स्वयंसेवकांमध्ये डॉ. गंजेवार, गोकुल यादव, मुन्ना खाडे, संध्या छापरवाल, अरुण काबरा,डॉ. कैलाश यादव, गणेश, राजगोपाल तिवारी आदींचा समावेश होता. तसेच महात्मा फुले हायस्कूल, बाबानगर येथील एनसीसी छात्र आणि नेहरू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीमच्या सादरीकरणातून पाहुण्यांचे स्वागत करत उपक्रमात रंगत आणली.
या उपक्रमाने केवळ गोदावरीच्या स्वच्छतेचाच नव्हे, तर समाजामध्ये धर्म, जात, वय, भाषा यांच्या पलीकडे जाऊन पर्यावरणासाठी एकत्र येण्याची प्रेरणा दिली. नदीच्या पुनरुज्जीवनासाठी चालवलेली ही चळवळ सामाजिक एकतेचे आणि पर्यावरणीय जाणीवेचे मूर्त रूप ठरली आहे. माँ गोदावरीच्या संरक्षणासाठी नांदेडकरांनी घेतलेली ही शपथ भविष्यातील पिढ्यांसाठी नक्कीच अमूल्य ठरेल.