नांदेड दि.२७ जून :
मुदखेड येथील एका माजी सेवानिवृत्त सैनिकांच्या शारदा पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या दोन कामगारांनी ५ लाख २१ हजार रुपयांचा गैरव्यवहार केला असून मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पंपावर काम करणाऱ्या दोघांनी संगनमत करून पेट्रोल व डिझेल विक्री केलेली रक्कम घेऊन पोबारा केला आहे.
मुदखेड येथील माजी सेवानिवृत्त सैनिक तथा माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे यांचा शारदा पेट्रोल पंप असून या पेट्रोल पंपावर एकूण ८ जण काम करतात. दररोज एका पाळीत चार जण काम करतात. त्यापैकी दोन मशीन काम करणाऱ्या दोघांनी संगनमत करुन डिझेल विक्री केलेले पैसे घेऊन जाण्याच्या डाव रचला. त्यानुसार २३ जून रोजी उमरी तालुक्यातील पळसगाव येथील संदिप उर्फ चिक्या ४ हजार १७१ लिटर डिझेलची विक्री केली असून ३ लाख ८३ हजार ८४६ रुपयांचा त्यांनी व्यवसाय केला. त्यापैकी पंपावरी फोन पे मशीनवर ७४ हजार ८४६ रुपये भरले मात्र उर्वरित ३ लाख ९ हजार रुपये घेऊन वडिलांचा अपघात झाल्याचे कारण सांगून पळसगाव येथे गेला. त्यांचा शोध घेतला असता गावाकडे आला नसल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे मुदखेड येथील मठ गल्लीत राहणारा योगेश माधव शेट्टे यांनी ५ जूलै रोजी पंपावर काम करुन २ हजार ४६० लिटर डिझेल विक्री केलेले २ लाख २६ हजार ३८९ रुपये त्यांच्या जवळ होते. त्यापैकी १४ हजार ३६९ रुपये पंपावरील फोन पे मशीनवर भरुन २ लाख १२ हजार रुपये घेऊन पोबारा केला. सदरील घटना शारदा पेट्रोल पंपाचे मालक सेवानिवृत्त माजी सैनिक तथा माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे यांना कळाली. तातडीने देवदे यांनी त्यांच्या कुटूंबियांना कल्पना देऊन सदर रक्कम परत करण्याची विनंती केली. मात्र नातेवाईकांनी पैसे परत करण्याची हमी घेऊन पैसे परत न मिळाल्याने लक्ष्मण देवदे यांनी मुदखेड पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी संदिप उर्फ चिक्या वाघमारे व योगेश माधव शेट्टे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्यांचा तपास पोलिस करीत आहेत.

सेवानिवृत्त सैनिकांची तक्रार घेण्यास टाळाटाळ
मुदखेड येथील शारदा पेट्रोल पंपावरील कामगार संदिप उर्फ चिक्या वाघमारे व योगेश माधव शेट्टे यांनी ५ लाख २१ हजार रुपयांचा अपहार केल्याची तक्रार मुदखेड पोलिसांना दिली. मात्र सदरील गुन्हा घडलेल्या बीट जमादार व आरोपीच्या नातेवाईकांचे संबंध असल्यामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. मात्र सेवानिवृत्त सैनिक लक्ष्मण देवदे यांनी पोलिस निरीक्षक चव्हाण यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यावेळी गुन्हा दाखल केला. मात्र सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी माजी सैनिकांना पोलिस ठाण्याचे हेलपाटे मारावे लागले हे दुर्दैव आहे.