नांदेड: दिवसभराच्या सततच्या कामकाजानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डीले (Rahul Kardile) एकेदिवशी सायंकाळी सहाच्या सुमारास कार्यालयीन कामकाज आटोपून घरी निघण्यासाठी गाडीत येऊन बसतात. त्याचवेळी त्यांची नजर गेटवर उभ्या असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकावर खिळते. ते हातात एक पिशवी घेऊन उभे होते. तेव्हा जिल्हाधिकारी राहुल कर्डीले एका क्षणाचाही विचार न करता त्यांना जवळ बोलावून घेतात. तेव्हा यावरून त्यांची कर्तव्यनिष्ठता आणि सामान्य नागरिकांच्या प्रति असलेली उदार भावना कॅमेरात कैद होते. (Nanded News)
जिल्ह्यात १५ ऑगस्ट पासून सततची अतिवृष्टी चालू आहे, जिल्ह्यातील जवळपास ८० टक्के शेतीवरील पिके उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे महसूल प्रशासनावर अतिरिक्त कामाचे ओझे आहे. त्याचबरोबर विविध समाजाचे मोर्चे, पक्ष व संघटनांचे धरणे आंदोलन, अतिवृष्टीनंतर नुकसानीच्या संदर्भाने कार्यालयातील लोकप्रतिनिधींच्या बैठका आणि सततच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्यावरही कामाचा अतिरिक्त भार वाढलेला आहे. त्याचबरोबर सामान्य नागरिकांच्या दूरभाष वरील संदेशांचेही समाधान करण्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डीले मागे राहत नाहीत. तेव्हा अशा परिस्थितीत आपले कार्यालयीन कामकाज आटोपून ता. ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास कार्यालयाच्या पायऱ्या उतरून ते गाडीत बसतात. परंतु त्याचक्षणी गेटवर उभ्या असलेल्या जेष्ठ नागरिकांकडे त्यांचे लक्ष जाते. लागलीच ते त्यांना गाडी जवळ बोलवून घेतात. जवळपास दोन ते तीन मिनिट त्यांच्यात संवाद होतो आणि त्यानंतर त्यांची गाडी हळूच कार्यालयातून बाहेर पडते आणि संवाद झालेल्या जेष्ठ नागरिकाच्या चेहऱ्यावर समाधानाची छटा उमटते. यावेळी हा संपूर्ण हा क्षण कॅमेरात कैद होतो.