सेवाज्येष्ठता आणि विशेष शिक्षकांना डावलून कनिष्ठाकडे पदाभार देण्यास प्रशासन सज्ज.
नांदेड दि.१२ ऑक्टोबर :नांदेड शहरातील नवा मोंढा स्थित मगनपुरा भागात असणाऱ्या आर.आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात सर्व काही आनागोंदी कारभार चालू आहे. त्याचे झाले असे की दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक नितीन निर्मल यांना अर्धांगवायूचा अटॅक आल्याने ते दीर्घ वैद्यकीय रजेवर गेले असून घरी उपचार घेत आहेत. त्यानंतर दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी संस्थेचे सचिव प्रकाश मालपाणी यांनी ठराव घेऊन विद्यालयातील सेवा जेष्ठता आणि विशेष शिक्षक यांना डावलून कलाशिक्षक मधुकर मनुरकर यांना सदरील पदावर नियुक्त करण्याचा ठराव पारित करून जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी जिल्हा परिषद तळमजला नांदेड यांना दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी सादर केला.
दिव्यांग संहिता २०१८ च्या कलम ४३ आणि ४४ नुसार जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी नांदेड यांनी संस्थेने सादर केलेल्या प्रस्तावाचा अभ्यास करून प्रस्तुत प्रस्ताव चूक असल्याचे आणि परत सेवाज्येष्ठता आणि विशेष शिक्षक यांची नव्याने नियुक्ती करून संस्थेने फेर प्रस्ताव तात्काळ या कार्यालयास सादर करण्याचे आदेश दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी दिलेले आहेत. परंतु संस्थेला ते आदेश मान्य नसल्याने कलाशिक्षक मनुरकर आणि संस्थेचा मुनिम हे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालयात जाऊन पूर्वी दिलेला आदेश रद्द करण्याच्या हालचाली करत असल्याचे दिसून येत आहे. त्यास जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांनी सुद्धा मूक संमती दिल्याचे ऐकवयास मिळत आहे. त्यामुळे दिनांक २४ सप्टेंबर २०२५ पासून संस्थेचा प्रस्ताव फेटाळलेला असताना सुद्धा तोच कलाशिक्षक प्रभारी मुख्याध्यापकाच्या पदावर कार्यरत असून त्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तसेच संस्थेने एका मुनीमाला चाणक्य समजुन संस्थेचे कामकाज पाहण्यास दिले असता तो मुनीम श्री.सी.व्हि.रामतिर्थे हे स्व:ताच्या लाभासाठी संस्थेच्या दोन्ही दिव्यांग शाळेत जास्तीचा हस्तक्षेप करत आहेत, स्वतःचा प्रशासक नावाचा बोर्ड शाळेत लाऊन ठेवला आहे. दोन्ही दिव्यांग शाळेतील मुख्याध्यापक हे अज्ञानी असल्याचे व सालगड्याचे काम करीत असल्यामुळेच संस्थेला प्रशासक ठेवण्याची गरज पडली असल्याचे निष्पन्न होत आहे, याबरोबरच शाळेमध्ये आणखीही बराच सावळा गोंधळ असल्याचे दबक्या आवाजामध्ये ऐकवास व प्रत्यक्षात पहावयास मिळाल्यामुळे सकल दिव्यांग संघटना तथा बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे, दिव्यांग कल्याण विभाग सचिव तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, जिल्हा सक्षमीकरण अधिकारी नांदेड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नांदेड यांना निवेदने देऊन पाठपुरावा केला व आपल्या दिव्यांग शिष्टमंडळासह आर.आर.मालपाणी विद्यालयाची प्रत्यक्ष भेट घेऊन पाहणी केली. विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला असता फार मोठा अनागोंदी कारभार होत असल्याचे समोर आले आहे.
शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त केलेले कर्मचारीच शाळेत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसून आले. यामध्ये मुळात कलाशिक्षक मधुकर मनुरकर यांची शैक्षणिक अर्हता व व्यावसायिक अर्हताच संशयाच्या भोवऱ्यात सापडली. समाज कल्याणने मनुरकर यांना संच मान्यता (अप्रोव्हल) कधी दिलेला आहे आणि यासाठी आवश्यक असलेला कोर्स त्यांनी कधी केलेला आहे हे पाहणे गरजेचे असताना आप्रोव्हल निघाला कसा हा फार मोठा गंभीर प्रश्न समोर आल्यानंतर राहुल साळवे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी अजुन सखोल चौकशी केली असता याच विद्यालयातील मानसशास्त्रज्ञ सौ.मनीषा तिवारी यांच्या संदर्भातही असेच घडल्याचे समोर आले आहे. मनीषा तिवारी यांचा मानसशास्त्रज्ञ कोर्स कधी झालेला आहे आणि त्यांना समाज कल्याणने मान्यता (अप्रोव्हल) कधी दिला आहे तर Clinical psychology course होता का..?
आणि RCI चे लायसन्स त्यांच्याकडे होते का…? त्यांनी ते लायसन्स कधी घेतले आहे हे सर्व संशयास्पद कळाले, तसेच याच विद्यालयातील क्लर्क किरण रामतीर्थे यांचे समाज कल्याण कडून अप्रोव्हल घेतांना मराठी टाईपींग ३०,४० आणि इंग्लिश टाईपींग ३०,४० आवश्यक होती ती त्यांनी केली होती का…? नव्हती केली तर मग आप्रोव्हल कसा निघाला हा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासह याच विद्यालयात विशेष शिक्षक या पदासाठी दिनांक २५ नोव्हेंबर२०२४ रोजी दैनिक प्रजावाणी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन प्रत्यक्ष मुलाखत घेऊन जास्त अनुभव असलेल्या गुणवत्ता धारक माधव जाधव यांना डावलून फक्त एका वर्षाचा अनुभव असलेल्या मुख्याध्यापक नितीन निर्मल यांच्या सुनेची निवड करण्यात आली ती निवड कोणत्या गुणवत्तेच्या आधारावर करण्यात आली आहे कारण त्यांनी एकाच वर्षांचा कोर्स केलेला असुन त्या कोर्सवरच प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे याची सखोल चौकशी होणे गरजेचे असताना प्रकरण का दाबल्या गेले हे अजून कोड्यातच ठेवलेले आहे, असाच काहीसा प्रकार श्री रामप्रताप मालपाणी मुकबधीर विद्यालयात सुद्धा घडलेला समोर आला आहे.
शासन निर्णय १८ ऑगस्ट २०२४ चे उल्लंघन करून कनिष्ठ लिपिक पद (मान्य) रिक्त नसताना रिक्त पद दाखवून श्रीमती कोटीवाले यांचे पती-पत्नी एकत्रिकरण लाभाखाली बेकायदेशीर समायोजनाची कुठलीच चौकशी झाली नाही, समायोजनाचा आदेश, शासन निर्णय व आयुक्त यांचे कनिष्ठ लिपिक पद भरण्यास मिळालेल्या नाहरकतचे स्पष्टिकरण पत्राची पाहणी न करता लिपीक व त्यांचे पती पाटिल यांना आजवर कोट्यवधी रुपयांचा पगार देण्यात आला आहे. आर्थिक देवाणघेवाण करून पळवाट निर्माण करून आजवर शासनाची फसवणूक करत बेकायदेशीर प्राप्त केलेला पगार शासन दरबारी वसुल करण्यात यावे अशी सुद्धा मागणी सकल दिव्यांग संघटना तथा बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, प्रादेशिक उपायुक्त लातुर, जिल्हा दिव्यांग सक्षिमीकरण अधिकारी नांदेड यांच्या कडे केली आहे.
तर पुढील कार्यवाहीसाठी मंत्रालयातील दिव्यांग कल्याण विभाग सचिव तुकाराम मुंढे, दिव्यांग कल्याण आयुक्त पुणे आणि स्थानिक पातळीवर पोलीस अधिक्षक नांदेड यांना दिले आहे तसेच या निवेदनात महत्वाची बाब सुद्धा नमुद केली आहे की उपरोक्त सर्व प्रकार घडला म्हणजे नांदेड शहर तथा संपुर्ण जिल्ह्यातील दिव्यांग शाळेत जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे नातेवाईक सुद्धा मोठ्या प्रमाणात भरती झालेले असावेत याची सखोल चौकशी करण्याची सुद्धा मागणी करत अशी चौकशी जशी जिल्हा परिषद मधील बोगस दिव्यांग शिक्षक व कर्मचारी यांची तपासणी सचिव मुंढे यांनी सुरू केली आहे तशीच दिव्यांग शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हेतीची सखोल चौकशी नांदेड शहर तथा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात करण्याची मागणी सुद्धा साळवे यांनी दिव्यांग कल्याण विभाग सचिव तुकाराम मुंढे यांच्याकडे केली आहे तर जिल्हाधिकारी नांदेड आणि मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी मालपाणी शाळेतील कर्मचाऱ्यांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हेतीची जोपर्यंत चौकशी होणार नाही तसेच मालपाणी शाळेत लावण्यात आलेल्या प्रशासक या पाटीची चौकशी होणार नाही तोपर्यंत आपल्या स्तरावरून प्रशासक नेमण्याची सुद्धा मागणी राहुल साळवे यांनी केली आहे.