नांदेड दि. २९ संष्टेबर : यंदा मराठवाडा विभागात झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे आणि नांदेड शहरात आलेल्या प्रचंड पूरस्थितीमुळे शेकडो विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. गोदावरी नदीची पातळी वाढल्यामुळे २५वर्षांनंतर १७ गेट्स उघडावी लागली आणि शहरातील अनेक भाग ४ ते ५ फूट पाण्याखाली गेले. परिणामी नागरिकांची घरे, वस्तू, शैक्षणिक साहित्य आणि विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्रे वाहून गेली.
पूरामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. वह्या, पुस्तके, ओळखपत्रे, प्रमाणपत्रे आणि इतर शैक्षणिक साहित्य वाहून गेल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा अर्ज भरणे, फी भरणे आणि शिक्षण सुरू ठेवणे कठीण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद पवार तर्फे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तातडीच्या सवलतींची मागणी करण्यात आली आहे. अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ करण्यात यावे. शैक्षणिक शुल्क व वसतिगृह शुल्क माफ करण्यात यावे. विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना अशा विद्यार्थ्यांना शुल्क सवलत देण्याचे निर्देश द्यावेत. पूरस्थितीमुळे ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची अंतिम दिनांक उलटली आहे, त्यांना अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी. विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यापीठाने पुढाकार घेत परीक्षा अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख वाढवून दिली आहे. या निर्णयाचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने स्वागत केले असून, पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शिक्षणात दिलासा मिळाल्याने आनंद व्यक्त करण्यात आला आहे.राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष फैसल सिद्दीकी यांनी सांगितले की, विद्यार्थी व पालक वर्गाकडून या मागणीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा आणि त्यांचे शिक्षण अडचणीत येऊ नये, या हेतूने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद पवार तर्फे हे निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देते वेळेस अमितसिंघ सुखमणी, युसुफ अन्सारी, सुरज कदम, योगेश शिंदे, शिवानंद वाकडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!