नांदेड/ मुंबई दि.११ जुलै: आझाद मैदान येथे सकल दिव्यांगांच्या न्यान्य मागण्यांसाठी चालू असलेल्या आंदोलनाकडे विरोधी पक्षातील आमदार रोहित पवार यांनी पूर्णतः दुर्लक्ष केल्याची तीव्र नाराजी दिव्यांग संघटनांनी व्यक्त केली आहे. अनेक दिवसांपासून विविध मागण्यासाठी जिल्ह्यांतून आलेल्या दिव्यांग बांधवांनी आझाद मैदानात ठाण मांडले असून त्यांचे मागण्या शासकीय धोरणात समाविष्ट व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे.
मात्र, स्वतःला युवानेते म्हणवणाऱ्या रोहित पवार यांनी या आंदोलनस्थळी भेट देणे टाळल्यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये मोठा असंतोष आहे. सर्वच राजकीय नेत्यांनी केवळ निवडणुकीच्या काळात दिव्यांगांसाठी आश्वासनं द्यायची आणि प्रत्यक्षात पाठिंबा न देण्याची वृत्ती आता उघड झाली असल्याचे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले.
सकळ दिव्यांग हक्क कृती समितीचे प्रतिनिधी म्हणाले, “सरकारकडून दुर्लक्ष तर होतंच आहे, पण विरोधी पक्ष देखील आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही. रोहित पवार हे युवा नेतृत्व म्हणून ओळखले जातात, पण त्यांनी आमच्याशी संवाद साधण्याचा किंवा भेट देण्याचा साधा प्रयत्नही केला नाही.”
दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एकीकडे संवेदनशीलतेच्या गप्पा मारणारे नेते जर प्रत्यक्षात अशा संघर्षाला पाठीशी घालू शकत नसतील, तर त्यांची निष्ठा फक्त भाषणापुरतीच मर्यादित आहे का, असा सवाल निर्माण झाला आहे.
आंदोलन सुरूच राहणार असून, दिव्यांग हक्कांसाठी पुढील टप्प्यात मंत्रालयावर मोर्चा नेण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे.