पणजी , २४ सप्टेंबर : गोव्यात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या डिजिटल डेमॉक्रसी डायलॉग (D3) चे आयोजन करण्यात आले. या परिषदेत नेते, तज्ज्ञ, निर्माते आणि तरुणांचा सहभाग होता. डिजिटल सशक्त आणि सर्वसमावेशक भविष्याची दिशा ठरवण्यात आली. या कार्यक्रमात तंत्रज्ञान लोकशाहीला बळकटी देऊन नागरिकांना शासनाशी जोडू शकते, तसेच नवोन्मेष, संस्कृती आणि शाश्वत विकासावर महत्त्वपूर्ण चर्चा घडवून आणली गेली.
या दृष्टीकोनातून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी D3 कम्युनिटी ऑफ डिजिटल क्रिएटर्स आणि डायलॉग बुक चे लोकार्पण केले. यामुळे क्रिएटर्स व इन्फ्लुएन्सर्सना सार्वजनिक मत घडविणे, जनजागृती करणे आणि गोव्याच्या विकास प्रवासात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले. चर्चेत बीच टुरिझम पलीकडे क्रीडा, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाचा विस्तार करण्याच्या शक्यता मांडल्या गेल्या. तसेच मोपा विमानतळ, अटल सेतू आणि रोबोटिक्स व मरीन क्लस्टर्ससारख्या उदयोन्मुख क्षेत्रांद्वारे शाश्वत विकास आणि नवकल्पनांवर भर देण्यात आला.
आपले विचार मांडताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, “परशुराम भूमीत हा कार्यक्रम होणं माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १४ वर्षांनी गोवा मुक्त झाला आणि आज उच्च GDP, १००% साक्षरता आणि मोफत शिक्षणासह अभिमानाने उभा आहे. ‘घर घर बिजली’ आणि ‘पीएम आवास योजना’ पासून ते IIT आणि NIT सारख्या जागतिक दर्जाच्या सुविधा गोव्यात उपलब्ध होत आहेत. समानता आणि धार्मिक सौहार्द जपत गोवा पुढे जात आहे. आमचा वारसा— पुनर्स्थापित सप्तकोटीश्वर मंदिर— हे आधुनिक यशांसोबतच मोपा विमानतळ व पंचतारांकित पर्यटनाच्या स्वरूपात अभिमानाने उभा आहे. अधूनमधून काही नकारात्मक गोष्टी पसरवल्या जात असल्या तरी आमचं डबल इंजिन सरकार विकास, शाश्वतता आणि ‘विकसित गोवा २०३७’ च्या दिशेने, तसेच ‘विकसित भारत २०४७’ च्या मोठ्या दृष्टीकोनाचा भाग म्हणून कार्यरत आहे.”
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, डॉ. विनय सहस्रबुद्धे (उपाध्यक्ष, RMP), विनोद पवार (सचिव, RMP) आणि गिरीराज पाई वेरणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.