तुषार कांबळे ! हदगाव प्रतिनिधी | हदगाव तालुक्यातील मनाठा–विठ्ठलवाडी–तरोडा–केदारनाथ हा प्रमुख रस्ता मुसळधार पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे रस्त्यात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून कडेला झालेल्या धूपेमुळे रस्ता वाहतुकीस अयोग्य ठरला आहे. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
या रस्त्याने दररोज शेकडो वाहनांची ये-जा होते. हा मार्ग तळेगाव फाटा मार्गावरून नांदेड, वारंगा तसेच इतर तालुक्यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. मात्र रस्त्याच्या विदारक अवस्थेमुळे प्रवास विस्कळीत झाला आहे. विशेष म्हणजे, वारंगा येथे दर आठवड्याला मोठा बाजार भरतो. परिसरातील शेतकरी आपला भाजीपाला, धान्य, कडधान्य घेऊन याच रस्त्याने नांदेड व वारंगा बाजारपेठेकडे जातात. परंतु रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे अनेक शेतकऱ्यांचा माल वेळेत बाजारात पोहोचू शकला नाही. काहींना दूरचा वळसा घालून अतिरिक्त खर्च करून प्रवास करावा लागत आहे.
या मार्गावर केदारगुडा येथील हेमाडपंथी महादेव मंदिर तसेच तालुक्यातील प्रसिद्ध केदारनाथ मंदिर आहे. वर्षभर मोठ्या संख्येने भाविक या रस्त्याने दर्शनासाठी प्रवास करतात. मात्र सध्या रस्त्यावरील चिखल, खड्डे आणि वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे यात्रेकरूंना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून मार्ग सुरळीत करावा, अन्यथा मोठं जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा डॉ. दीपक नाईक, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अंकुश मिरासे, श्रीरंग देशमुखे, बारकू नाईक, मारोती बोरकर, परसराम नाईक, सुदाम बोरकर, प्रमोद धनवे, दुलबा धनवे, पंडित बोरकर, आदिनाथ अंकमवार, लिंबाजी बोरकर, राघोजी भुरके, उत्तम वानोळे, विश्वंभर बोरकर, आदींनी दिला आहे.
एका प्रवाशाने संताप व्यक्त करताना सांगितले की,
“अगोदरच ह्या रस्त्याची चाळणी झाल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. सततच्या पावसाने तर रस्ता नावालाच उरला आहे. भाविक, शेतकरी, व्यापारी सगळ्यांचे हाल होत असतानाही प्रशासन गेंड्याच्या कातडीसारखे बधिर झाले आहे, हे अत्यंत चिंताजनक आहे.”
“लवकरच हा रस्ता नागरिकांसाठी खुला करून देण्यात येईल. जास्त पावसामुळे व बाजूने नाल्या नसल्यामुळे हा रस्ता दबला आहे. कॉन्ट्रॅक्टरला बोलून रस्ता सुरळीत करण्यात येईल. तसेच मनाठा ते विठ्ठलवाडी या मार्गाची दुरुस्ती लवकरच हाती घेतली जाणार आहे.”
आकाश राठोड
सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे.ई.
## सत्यप्रभा न्यूज नांदेड #