पणजीः ६ ऑगस्ट : गोव्यात कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस प्रशासन पोलीस खाते वाखाणण्याजोगे काम करत आहे. पोलिसांचा सरासरी प्रतिसाद केवळ ११ मिनिटे २२ सेकंद इतका असून, हे राज्याच्या आपत्कालीन प्रतिसाद क्षमतेतील महत्त्वाचे पाऊल आहे.
याच अनुषंगाने सार्वजनिक सुरक्षेला बळकटी देण्यासाठी आणि आपत्कालीन सेवेचा वेग वाढवण्यासाठी ERSS-११२ अंतर्गत पाच नवीन पीसीआर व्हॅन्सना (Police Control Room) गोवा पोलिसांच्या ताफ्यात सामील करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभा परिसरात हिरवा झेंडा दाखवत या गाड्यांचे लोकार्पण केले. लोकार्पण करण्यात आलेल्या या व्हॅन मांद्रे, मोपा, वाळपई, कुंकळ्ळी आणि काणकोण परिसरात सेवा बजावतील अशी माहिती देण्यात आली आहे.
याबाबत मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, पुढील टप्प्यात ‘पिंक फोर्स’च्या १४ गाड्या (Pink Force vehicles) महिला सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार असून या सोबतच सार्वजनिक ठिकाणी ‘रोबोट पेट्रोलिंग’ (robot patrols) सुरु करण्यात येणार आहे. गोवा हे स्थानिक आणि पर्यटकांसाठी सुरक्षित राहावे, यासाठी सरकार कटिबद्ध असून या सर्व उपक्रमांद्वारे राज्यात अधिक जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह पोलीस सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.