Raj Thackeray: कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे मी एका मुलाखतीमध्ये म्हणालो होतो आणि त्या मुलाखतीपासूनच आम्ही एकत्र येण्याला सुरुवात झाली. आज मुंबईसाठी शिवसेना आणि मनसे युती झाल्याचे जाहीर करत आहोत, अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशी राज आणि उद्धव यांची संयुक्त पत्रकार परिषद आज हॉटेलमध्ये पार पडली. यावेळी अत्यंत स्मित हास्य करत राज ठाकरे यांनी युती केल्याच जाहीर केलं. मात्र, मुंबईमध्ये कोण किती जागा लढवणार हे आम्ही आता सांगणार नाही, असे सांगत भाजपला प्रत्यक्ष टोला लगावला. राज ठाकरे महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरत आहेत. त्यामध्ये दोन टोळ्या अजून जास्त अॅड झाल्या आहेत ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात, असा टोलाही राज यांनी लगावला. मुंबईमध्ये मराठी आणि आमचाच महापौर होणार असा विश्वास राज यांनी व्यक्त केला. बाकी जे बोलायचं ते आम्ही जाहीर सभांमधूनच बोलू, माझ्याकडे सुद्धा खूप व्हिडिओ असल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला सुद्धा इशारा दिला.
मुंबईचा महापौर मराठीच होणार राज ठाकरे म्हणाले की, बरेच दिवस ज्या क्षणाची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे जाहीर करत आहोत. जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल ती कधी भरायची केव्हा भरायची ते कळवलं जाईल. मुंबईच्या महापौरपदाबद्दल त्यांनी सांगितले की, मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार आहे. ज्यांचं मुंबई मुंबईवर, महाराष्ट्रावर, मराठी माणसावर प्रेम आहे अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा, असे भावनिक आवाहन त्यांनी केलं.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबईचे लचके तोडायचे आहेत, मुंबईच्या चिंधड्या उडवायच्या हे मनसुबे त्यावेळी ज्यांना मुंबई पाहिजे होती त्यांचेच प्रतिनिधी दोघेजण दिल्लीत बसलेले आहेत त्यांचे हे मनसुबे आहेत. आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत आणि मी मागेच म्हटलं एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी. यापुढे मुंबईवरती आणि महाराष्ट्रवर कोणी वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने महाराष्ट्राला मुंबईपासून किंवा मुंबईला महाराष्ट्रपासून मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत, असा इशाराच उद्धव यांनी दिला. ते म्हणाले की, मराठी माणसाला आवाहन करत त्यांनी स्पष्ट केले की, आता जर का चुकाल तर संपाल, आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल, म्हणून परत एकदा तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका हाच एक संदेश मी आमच्या आज दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देतो आहे, अशी भावनिद साद त्यांनी घातली.