तुषार कांबळे ! हदगाव प्रतिनिधी !
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील चिंचगव्हाण या छोट्याशा खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्मलेला हर्षदा उर्फ खुशी अमोल भुतनर (नाईक) हिनं कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आयुष्याचं मोठं स्वप्न साकार केलं आहे. अहमदनगर येथील नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचा प्रवेश मिळवून हर्षदाने केवळ स्वतःच्या कुटुंबाचं नाही तर संपूर्ण परिसराचं नाव अभिमानानं उजळवलं आहे.
वडिलांचं कष्ट, लेकीचं स्वप्न
हर्षदाचे वडील अमोल भुतनर (नाईक) हे शेतकरी आहेत. हलाखीची आर्थिक परिस्थिती, पावसावर अवलंबून असलेलं शेतीचं जीवन आणि दररोजच्या संघर्षातसुद्धा त्यांनी आपल्या मुलीचं शिक्षण खंडित होऊ दिलं नाही. घरची परिस्थिती बेताची असतानाही, “माझ्या मुलीला डॉक्टर करायचं” हे वडिलांचं स्वप्न होतं आणि त्यासाठी त्यांनी अक्षरशः काबाडकष्ट केले.
पहिल्या प्रयत्नात अपयश – पण हार नाही!
खुशीला 2024 मध्ये offline क्लास लावले ,आणि NEET परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात 582 गुण मिळाले होते. हे गुण उत्तम असले तरी वैद्यकीय प्रवेशाच्या तीव्र स्पर्धेत तिचं स्वप्न अपूर्ण राहिलं. अनेक विद्यार्थी येथेच खचले असते, पण खुशीसाठी हे अपयश प्रेरणादायी ठरलं. “यश मिळेपर्यंत लढायचं” हा निर्धार करून तिनं पुन्हा नव्या जोमानं अभ्यास सुरू केला.
मोबाईलवरून अभ्यास – ऑनलाईन शिक्षणाचा लाभ
आर्थिक परिस्थितीमुळे खुशीला महागडे ऑफलाइन कोचिंग क्लासेस लावता आले नाहीत. मात्र तिच्या जिद्दीने हार मानली नाही. तिनं मोबाईलद्वारे ऑनलाईन फिजिक्सवाला (PhysicsWallah) या प्लॅटफॉर्मवर अभ्यास केला. स्वतःच वेळापत्रक आखून, शेतात व घरी मदत करत अभ्यासासाठी रात्रंदिवस झटत राहिली.
2025 मध्ये यशाची गोड फळ
तिच्या कष्टांना यावर्षी फळ आलं. NEET 2025 मध्ये खुशीने पात्रता मिळवली आणि अहमदनगरच्या वैद्यकीय महाविद्यालयात तिला एमबीबीएस प्रवेश निश्चित झाला. तिच्या या यशाची बातमी कळताच गावात, नातेवाईकांत आणि मित्र-मैत्रिणींमध्ये आनंदाची लहर पसरली.

हर्षदाचे प्रेरणादायी मत
खुशी म्हणते –
“पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं नाही तरी आपण खचून जायचं नाही. प्रत्येक अपयश आपल्याला नवं शिकवतं. अभ्यासामध्ये सातत्य ठेवलं आणि आत्मविश्वास पक्का केला तर यश नक्की मिळतं. माझ्या वडिलांनी परिस्थितीशी झगडून मला शिकवलं, त्यांच्यामुळेच आज मी इथं पोहोचले आहे.”
कू.हर्षदा उर्फ खूशी अमोल भुतनर(नाईक)
संपूर्ण तालुक्यासाठी प्रेरणादायी
खुशीचं यश हे केवळ एका मुलीचं यश नाही, तर शेतकरी कुटुंबातील मुलांनी मोठं स्वप्न पाहिलं तर ते नक्कीच पूर्ण होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण आहे. चिंचगव्हाण गावातले लहानथोर तिचं कौतुक करत आहेत.

##सत्यप्रभा न्युज नांदेड ##