नांदेड, दि. ५ नोव्हेंबरः जाहिरात डिझाईन हेच विश्व मानणारे आणि कलासक्त व्यक्तिमत्त्व असलेले उत्कृष्ट कलाकृतींचे निर्माते, ग्राफिक्स डिझायनर तथा यशश्री क्रिएशन्सचे संचालक शिवानंद सुरकूटवार यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बुधवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.१५ वाजता निधन झाले.
नांदेडच्या जाहिरात क्षेत्राला एक वलयांकित ओळख प्राप्त करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. जाहिरात निर्मितीच्या क्षेत्रात त्यांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. साध्या डीटीपीच्या मर्यादेपलीकडे जाऊन ब्रँड प्रमोशन, लोगो डिझाईन, ट्रेडमार्क, ब्रँडिंग स्ट्रॅटेजी, मार्केट अॅनालिसिस आणि व्यवसाय वृद्धीसाठी सूक्ष्म नियोजन या संकल्पना त्यांनी नांदेडसारख्या शहरात रुजवल्या. जाहिरातीसाठी स्वतंत्र बजेट आणि नियोजित ब्रँड विकास याबाबत त्यांनी व्यावसायिकांना नवे भान दिले. दैनिक सत्यप्रभाच्या दिवाळी अंकासह इतर अनेक प्रकाशनांच्या निर्मितीत त्यांची सिंहाची भूमिका राहिली आहे.
नेहमी आपल्या कामात रममाण राहणारे, मनमिळावू, स्वच्छंदी, कलाप्रिय आणि वाचन-लेखनाची आवड असलेले शिवानंद सुरकूटवारांसारखे बहुपरिचित व्यक्तिमत्त्व अचानक हरपल्याने नांदेडसह संपूर्ण मराठवाड्याच्या कला आणि साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, चार भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे. उद्या दिनांक ६ रोजी सकाळी १० वाजता गोदावरी नदी वरील मार्कंडेय घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .













