नांदेड दि.५ जुलै : नांदेड शहरात दरवर्षी साजरा होणारा श्री महामाई माता आखाड पूजन महोत्सव हा केवळ धार्मिक परंपरा नसून गवळी समाजाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक एकात्मतेचे प्रतीक आहे. यंदाही हा महोत्सव ८ व ९ जुलै २०२५ रोजी देवी नगर, देगलूर नाका, नांदेड येथील श्री महामाई माता मंदिर परिसरात भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा होणार आहे. या महोत्सवाचे आयोजन श्री यादव अहीर गवळी समाज, नांदेड यांच्यावतीने करण्यात आले आहे.
या महोत्सवात नांदेडसह हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, हैदराबाद, भैंसा, लोहा, पूर्णा, बीड,
अहमदपुर कलबंर वाशिम
आदी भागांतून हजारो अहीर गवळी समाजबांधव मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात. समाजातील सर्व वयोगटातील लोक, विशेषतः तरुणाई मोठ्या उत्साहाने सहभागी होत असते, ज्यामुळे या महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचते.
संस्कृतीचे जतन आणि देवाण-घेवाण घडवण्यासाठी हा उत्सव महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. पारंपरिक पोशाख, वेशभूषा, लोकपरंपरा, पुजाविधी, आणि सामूहिक सहभाग यामुळे समाजाच्या मूळ सांस्कृतिक ओळखीचा ठसा घट्ट बसतो.
श्री यादव अहिर गवळी समाज हा प्रामुख्याने पशुपालक आणि शेतकरी असल्यामुळे, पूर्वीपासूनच चांगला पाऊस, भरपूर जलसंपत्ती, आणि सुख-समृद्धीसाठी माता महामाईची पूजा केली जाते. संकटमोचक, शक्तिस्वरूपा आणि करुणामयी अशा महामाईची आराधना श्रद्धेने केली जाते. आजही ही परंपरा तितक्याच निष्ठेने जपली जात आहे.
८ जुलै, मंगळवार रोजी पारंपरिक पद्धतीने “बगीचेकी माता पूजन” संपन्न होईल. समाजातील स्त्री-पुरुष, तरुणाई व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. ९ जुलै, बुधवार रोजी समाजातील सर्व कुटुंब आपआपल्या घरून गोंड भात तयार करून देवीला गोडजेवणाचा प्रसाद चढवितात आणि भाविक प्रेम, बंधुता आणि आत्मीयतेने गोड जेवण करून दोनदिवसीय कार्यक्रमाची सांगता भजन संध्येने करतात
या दोन्ही दिवशी मंदिर परिसरात भव्य जत्रा भरते. यात खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, झोके, खेळणी, हस्तकला वस्तूंची दुकाने आणि मनोरंजनाच्या विविध सुविधा असतात. लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठी हे आकर्षण ठरते.
हा महोत्सव धर्म, परंपरा आणि समाजबंध यांचं सुंदर रूप साकारतो. याचबरोबर, अहिर गवळी समाजाच्या एकात्मतेचा, श्रमसंस्कारांचा आणि संस्कृतीच्या वारशाचा अभिमानाने जागर करणारा हा उत्सव आहे.
श्री यादव अहीर गवळी समाज, नांदेड यांच्यावतीने राज्यभरातील सर्व समाजबांधवांना आणि नांदेड परिसरातील नागरिकांना कुटुंबासह उपस्थित राहण्याचे मन:पूर्वक आवाहन करण्यात येत आहे.श्रीगुल भजन मंडळी श्रीहर भजन मंडली
श्रीभगत भजन मंडली एवं संपूर्ण महिला मंडल यांच्या भजनाने संपूर्ण भजन संध्या संपन्न होणार आहे.