Sanjay Raut on Narayan Rane: दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव घेऊ नका अशी विनंती करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपल्याला फोन केला असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी असा कोणताही फोन केला नसल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. आपलं उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं असून, त्यांनी नकार दिला असल्याची माहिती संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. तसंच याउलट नारायण राणे यांना अटक केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाकडून उद्धव ठाकरेना फोन आल्याचं सांगितलं आहे.
“सुशांत सिंग आणि दिशा सालियन या दोन्ही आत्महत्या असल्याचं वारंवार सिद्ध आणि स्पष्ट झालं आहे. पण विरोधकांचा आणि खासकरुन ठाकरे कुटुंबाचा राजकीय बदनामीचा कट करण्यासाठी कधी हत्या तर कधी इतर वेगळा रंग देण्यात आला. पाच वर्षांनी दिशा सालियनच्या वडिलांना काही लोकांनी पुढे केलं आणि याचा तपास पुन्हा करावा यासाठी कोर्टात याचिका दाखल केली. जसं औरंगजेबाचं राजकारण चाललं आहे, तसंच मृतांचं राजकारण सुरु आहे,” असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले, “भाजपाचे लोक मृतांनाही सोडत नाहीत. चांगल्या घरातील लोक मृत पावल्यानंतर दुर्देव असतं, मात्र त्याचंही राजकारण करतात. त्या बदनामीत अनेक चांगल्या घरातील लोकांवर चिखल फेकून बदनाम करण्याचं अलीकडचं राजकारण भाजपाने सुरु केलं आहे. सगळ्यांना आता त्रास होत आहे, पण भाजपाचा हेतू साध्य होत नाही. ठाकरे, अनिल परब आणि आमच्यासारखे लोक ठामपणे लढत उभे आहेत”.
उद्धव ठाकरेंनी फोन केल्याच्या नारायण राणेंच्या दाव्यावर ते म्हणाले की, “माझं या विषयावर उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं. उद्धव ठाकरेंनी याला नकार दिला आहे. असा कोणताही फोन यासंदर्भात नाराणय राणेंना केलेला नाही आणि हे संभाषण झालेलं नाही. मिलिंद नार्वेकर यांच्याशी बोलणं झालं, त्यांनीही मी कधी कोणालो फोन लावून दिला नसल्याचं सांगितलं आहे. नारायण राणे कशाच्या आधारावर अशी विधानं करत आहेत हे समजून घेतलं पाहिजे. त्यांची प्रकृती बरी नाही का? सत्तरी पार केली असून आम्हाला त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता वाटते”.
“नारायण राणे यांना अटक केली, तेव्हा त्यांच्यासाठी कुटुंबातून उद्धव ठाकरेंना सांभाळून घ्या, त्यांची प्रकृती बरी नाही, त्यांना काही विकार आहेत असं सांगणारे फोन आले होते. यानंतर उद्धव ठाकरेंनी पोलिसांना सूचना देऊन संध्याकाळी सुटका करायला लावली. अमित शाह यांचाही केंद्रीय मंत्री आहेत, सांभाळून घ्या सांगण्यासाठी उद्धव ठाकरेंना फोन आला होता,” असा दावा संजय राऊतांनी केला आहे.
“या गोष्टी काढायच्या असतात का? तुम्ही काढल्यामुळे आम्हाला सांगावं लागत आहे. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. वैयक्तिक चर्चा अशाप्रकारे खोटा मुलामा लावून 5-10 वर्षांनी बाहेर काढल्या जात आहेत. असं काढायचं असेल तर प्रत्येकाचं काहीतरी असतं. महाराष्ट्रात असं वातावरण कधी नव्हतं. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संवाद कायम होता. कोणतीही कारवाई कुटुंबापर्यंत जात नव्हती. कुटुंबाची बदनामी होत नव्हती. दुर्दैवाने गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदी, अमित शाह यांचं राज्य आल्यापासून असं दळभद्री राजकारण सुरु झालं आहे”, अशी टीका यावेळी त्यांनी केली.