स्वदेशी कंपनी जोहो (Zoho) चा इन्स्टंट मेसेजिंग ॲप अरट्टई (Arattai) देशभरात लोकप्रिय होत आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत केवळ ५ लाख डाउनलोड्स असलेल्या या ॲपने आता १ कोटींपेक्षा जास्त डाउनलोड्स पार केले आहेत. लोक हळूहळू या ॲपचा वापर करू लागले आहेत आणि अनेकजण त्याला व्हॉट्सॲपचा पर्याय म्हणून पाहत आहेत. तथापि, सोशल मीडियावर या ॲपच्या ‘अरट्टई’ या नावाबद्दल चर्चा सुरु आहे. काहींना या नावात जागतिक (Global) ओळख निर्माण करण्याची क्षमता कमी वाटत असल्याचे दिसून आले आहे. अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर या ॲपचे नाव बदलण्याचीही सूचना दिली आहे.
मराठीमध्ये ‘अरट्टई’ म्हणजे ‘गप्पा’ (Arattai in Marathi) जोहोचे संस्थापक श्रीधर वेम्बू (Sridhar Vembu ) यांनी आपल्या ‘X’ (माजी ट्विटर) अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी एका प्रतिमेद्वारे विविध भारतीय भाषांमध्ये ‘अरट्टई’ शब्दाचा अर्थ स्पष्ट केला आहे. त्या पोस्टनुसार, मराठी भाषेत ‘अरट्टई’ (Arattai) म्हणजे ‘गप्पा’, तर हिंदीत याचा अर्थ ‘गपशप’ किंवा ‘गप्प’ असा होतो. त्यांच्या या पोस्टनंतर अनेक नेटिझन्सनी ‘अरट्टई’ नाव अधिक आपलेसे वाटत असल्याचे मत व्यक्त केले आहे.
लवकरच येणार नवे अपडेट्स : ‘अरट्टई’ ॲपमध्ये लवकरच काही महत्त्वपूर्ण तांत्रिक अपडेट्स येणार असल्याची माहिती श्रीधर वेम्बू यांनी दिली आहे. एका वापरकर्त्याने त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “‘अरट्टई’ हे नाव भारतीय भाषेतूनच आले आहे आणि लोक त्याचे लवकरच चाहते होतील. काही महत्त्वाचे अपडेट्स आल्यावर हे ॲप सर्वोत्कृष्ट बनेल.” या प्रतिक्रियेला उत्तर देताना श्रीधर वेम्बू म्हणाले — “अपडेट्स येत आहेत.”
जोहोचा अर्थ जाणून घेण्याची उत्सुकता : श्रीधर वेम्बू यांच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही वापरकर्त्यांनी ‘अरट्टई’ नाव आवडले असे म्हटले, तर काहींनी विचारले की ‘जोहो’ शब्दाचा अर्थ विविध भाषांमध्ये काय आहे? एका वापरकर्त्याने सुचवले की, जर या ॲपचे भारतीय भाषांमध्ये आवृत्त्या आणि AI भाषांतर (translation) सुविधा मिळाली, तर हे खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरेल. लोकांच्या वाढत्या प्रतिसादावरून स्पष्ट होते की, अरट्टई ॲपबद्दलची उत्सुकता आणि वापर दोन्ही झपाट्याने वाढत आहेत. आगामी अपडेट्सनंतर हे ॲप वापरणे आणखी सोपे आणि आकर्षक होणार आहे.