मुंबई:एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष ताब्यात घेतल्यानंतर अस्तित्त्वाची लढाई लढत असलेल्या ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. आतापर्यंत शिंदे गटाच्या शिवसेनेकडून राज्यभरात ठाकरे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महत्त्वाचे नेते गळाला लावले जाताना दिसत होते. परंतु, एकनाथ शिंदे यांनी यापुढे जात थेट शिवसेना भवनात ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे. शिंदे यांच्याकडून ठाकरे गटाच्या सभा, कार्यक्रम आणि सोशल मीडियावरील प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या शिवसेना भवनातील टीमलाच गळाला लावले आहे.
शिवसेना भवनातील या कर्मचाऱ्यांनी उद्धव गटाला रामराम ठोकल्यानंतर चांदिवली येथील एका जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपास्थितीत शिवसेनेत केला प्रवेश केला. यामध्ये अमोल मटकर, अमित शिगवण, अविनाश मालप, प्रथमेश चाचले या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्तीय आणि सचिव अनिल देसाई यांचा विश्वासू असलेला कट्टर सैनिक अशी ओळख असलेल्या अमोल मटकर यांच्या शिंदे गटात जाण्याने ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.अमोल मटकर हे शिवसेनेचे इव्हेंट्स, सोशल मीडिया आणि डिझायनिंग टीममध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावणारा कार्यकर्ता म्हणून पक्षात परिचित होता. दरवर्षी दसरा मेळावा, पक्षाचा आणि मार्मिकचा वर्धापन दिन या कार्यक्रमांच्या आयोजनाची आणि मंचावरच्या बॅकड्रॉप पासून संपूर्ण नेपथ्याची जबाबदारी अमोल यांच्यावर असायची. तसेच पोस्टर्स, बॅनर्स आणि सोशल मीडियावरचे मिम्स, कार्ड्स, फोटोज आणि व्हिडिओजचे डिझायनिंगच्या कामात महत्वाची भूमिका असायची.विशेष म्हणजे २०१२ च्या मुंबई महानगर पालिका निवडणुकीचे गाजलेले स्लोगन ‘होय, करून दाखवलं !’ या कॅम्पेनमध्ये अमोल यांचा महत्वाचा सहभाग होता. याचबरोबर सेना-भाजप युती सरकारमध्ये परिवहन खात्याचे मंत्री दिवाकर रावते यांच्या नेतृत्वात सर्व नव्या शिवशाही एसटी बसेसवरचे महाराष्ट्रभरात पोहचलेले लोगो सुद्धा त्यांनीच डिझाईन केले होते. यंदाच्या वर्षात स्वातंत्राचा अमृत महोत्सवाचा मराठी लोगो सुद्धा अम्ब्रेला डिझाइन्स यांच्या संकल्पनेतून साकारलेली अमोल यांचीच कलाकृती. त्यामुळे पक्षातील एक महत्वाचा शिलेदार ठाकरे गटाने गमावल्याची शिवसेनेत चर्चा आहे. आता ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलसाठी काय पावले उचलली जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!