सातारा : क्षेत्र माहुली (ता. सातारा) येथील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि युवा नेते संतोष जाधव यांच्यावर दोन जणांनी कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात संतोष जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास क्षेत्र माहुली येथे घडली. सातारा शहरातील प्रतापसिंहनगर परिसरात गेल्या चार दिवसांत ही तिसरी थरारक घटना घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, क्षेत्र माहुली येथील संतोष जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन चार जणांनी कोयत्याने वार केले. संतोष जाधव यांची दोघेजण पूर्वीच्या वादातून माफी मागायला म्हणून आले होते. मात्र त्यांनी कोयत्याने त्यांच्यावर वार केले. यामध्ये जाधव यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. नागरिकांनी जाधव यांना तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. संतोष जाधव यांच्या घरासमोर टपरी लावण्याच्या कारणावरून वाद झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.या घटनेनंतर पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तातडीने दखल घेऊन संशयितांना पकडण्याचे पोलिसांना आदेश दिले. पोलिसांनी माहुली परिसरातून काही तासांतच दोघांना ताब्यात घेतले. पोलीस त्यांच्याकडे कसून चौकशी करत आहेत. सातारा शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा या घटनेची नोंद झाली.
दरम्यान, येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील विजय ओव्हाळ या फळविक्रेत्यावर तीन ते चार हल्लेखोरांनी कोयत्याने आणि चाकूने सपासप वार केल्याची घटना सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या हल्ल्यात फळ विक्रेता गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात एकच खळबळ उडाली होती. नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सातारा शहरचे पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. लागोपाठ घडलेल्या या दोन घटनांमुळे शहरात कोयता गॅंगची दहशत शहरात निर्माण झाल्याचे चित्र आहे. #सत्यप्रभा न्यूज # नांदेड