नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून देशातील महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप करत भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्याविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. बृजभूषण सिंग यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी महिला खेळाडूंकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, आता यातील अल्पवयीन महिला कुस्तीपटूने बृजभूषण यांच्यावर केलेले आरोप मागे घेतल्याने कुस्तीपटूंमध्ये खळबळ उडाली आहे. दिल्ली पोलिसांनी या अल्पवयीन कुस्तीपटूचा जबाब पटियाला हाऊस न्यायालयात नोंदवला असून या कुस्तीपटूने २ दिवसांपूर्वीच बृजभूषण यांच्यावरील आरोप मागे घेतले आहेत.
महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर बृजभूषण यांच्यावर दोन गुन्हे नोंद करण्यात आले होते. या तक्रारीत बृजभूषण यांनी अनेकदा या अल्पवयीन कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच या तक्रारीत लैंगिक छळाबाबत सविस्तरपणे माहिती देण्यात आली होती. या तक्रारीनुसार, अल्पवयीन कुस्तीपटूने बृजभूषण यांनी आपल्याला त्यांच्याकडे खेचत खांद्यावर जोरदार दाबण्याचा प्रयत्न केला तसेच जाणीवपूर्वक खांद्यावरील हात खाली घेत शरीराच्या दुसऱ्या भागाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला होता. इतक नाही तर बृजभूषण यांनी आपला हात माझ्या शरीरावर फिरवत तू मला पाठिंबा दे, मी तुला पाठिंबा देतो, माझ्या संपर्कात राहा असे म्हणत या अल्पवयीन खेळाडूचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असा आरोप करण्यात आला आहे. या अल्पवयीन महिला कुस्तीपटूंच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनुसार, सदर घटना ही २०२२ मध्ये घडली. यावेळी ही खेळाडू केवळ सोळा वर्षांची होती. त्यावेळी तिने राष्ट्रीय स्पर्धेत सर्वप्रकारच्या ज्युनियर कुस्तीपटूंच्या खेळात सहभाग घेतला होता. बृजभूषणच्या कृत्याला या अल्पवयीन खेळाडूने विरोध केला होता. त्यानंतर बृजभूषण यांनी आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेचा सराव लवकरच सुरु होणार असून, जर मला सहकार्य केलं नाही तर याची किंमत चुकवावी लागेल, असे म्हणत तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.