मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार कोणत्याही क्षणी होईल, असे सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जात असताना, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मात्र मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याचा दावा केला आहे. सत्ताधारी पक्षांना आमदार पळून जाण्याची भीती असल्याने विस्तार होणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
राज्य सरकारला आपला कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी अजून दीड वर्षाचा कालावधी आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे दिल्लीत याबाबत खलबते झाल्याची माहिती समोर येत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याला अप्रत्यक्षरीत्या दुजोरा दिला आहे. अशातच दानवे यांनी मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसून, सरकारकडून फक्त वेळकाढूपणा केला जात आहे, असे म्हटले आहे. मंत्रिमंडळ विस्तारात किती जागा मिळतील याचा आधी विचार करून ठेवा. कित्येक लोक म्हणतात की, यांना आता भाजपच्या चिन्हावर लढावे लागणार आहे. भाजप हेच करणार आहे. लढा; पण आमच्या चिन्हावर लढा, असे सांगण्यात येत आहे,’ अशा शब्दांत दानवे यांनी शिवसेनेला टोला लगावला. ‘यांना आमदारांना सांभाळायचे आहे, मग अशा वेळी केवळ विस्ताराच्या घोषणा करायच्या. आता अधिवेशन येत आहे. त्यामुळे अधिवेशनआधी होईल, असे हे सांगत आहेत. नंतर ‘अधिवेशन झाल्यावर विस्तार करू’ असे सांगतील; पण मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता फार कमी आहे. ते फक्त घोषणाबाजी करीत आहेत,’ असे दानवे यांनी सांगितले. #सत्यप्रभा न्यूज # नांदेड