नांदेड, दि. ३० ऑगस्ट:- २८ ऑगस्ट रोजी माऊली तालुका मुखेड येथील व्यक्ती मौला नबीसाब शेख हे मौजे बेटमोगरा या शिवारामध्ये अडकलेले होते. संबंधित व्यक्ती बेटमोगरा येथे किराणा खरेदी करण्यासाठी आले होते. सायंकाळी माऊली कडे जात असताना उच्या पुलाजवळ पाणी आल्यामुळे पुलाला लागून असलेल्या शेडमध्ये त्यानी आश्रय घेतला. परंतु पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे बाहेर पडता आले नाही. त्यानी संपूर्ण रात्रभर शेडमध्येच आश्रय घेतला व मोठ्या हिमतीने तिथेच थांबले. ही गोष्ट स्थानिक प्रशासनाला समजली तेव्हा उपविभागीय अधिकारी देगलूर यांनी तहसीलदार मुखेड यांच्याशी संपर्क साधला. तहसीलदार मुखेड यांनी स्थानिक नगरपालिका बचाव टीम आणि पोलीस निरीक्षक मुखेड त्या ठिकाणी पोहोचले परंतु पाण्याचा प्रवास जास्त असल्याने संबंधित व्यक्तीला बाहेर काढता आले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित व्यक्तीला एस डी आर एफ मार्फत तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने एसडीआरएफ टीमने देगलूर तालुक्यामधील मेदनकाल्लूर गावामधील पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित हलवल्यानंतर तात्काळ बेटमोगराकडे रवाना झाले. उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांनी SDRF टीम सोबत रात्री साडेनऊ वाजता त्या ठिकाणी पोचले. रात्रीची वेळ असल्याने आणि पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने संबंधित व्यक्तीशी संपर्क होत नव्हते. संबंधित परिस्थिती लक्षात घेता स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने एसडीआरएफ टीम संबंधित व्यक्ती पर्यंत पोहोचून त्याला सुरक्षित रित्या रात्री अकरा वाजता बाहेर काढले. एसडीआरएफ टीमचे नेतृत्व श्री. राठोड आणि संकपाळ साहेबांनी मोठ्या धाडसाने संबंधित रेस्क्यू ऑपरेशन केले.
या बचाव कार्याचा जिल्हाधिकारी राहुल कर्डीले ही वेळोवेळी आढावा घेत होते. यावेळी प्रशासनामार्फत देगलूर उपविभागीय अधिकारी अनुप पाटील तहसीलदार मुखेड राजेश जाधव पोलीस निरीक्षक मुखेड केंद्रे संबंधित ग्रामस्थ आणि स्थानिक प्रशासन उपस्थित होते.













