न्यायालयाने फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीच्या (mehul choksi) प्रत्यार्पणाला शुक्रवारी मंजुरी दिली. तसेच भारताच्या विनंतीवरून त्याला बेल्जियममध्ये अधिकाऱ्यांनी केलेली अटक ही वैध असल्याचेही न्यायालयाने नमूद केले, असे अधिकाऱ्याने सांगितले.
चोक्सीच्या प्रत्यार्पणाच्या भारताच्या खटल्याला यामुळे मजबुती मिळाली असली तरी, त्याच्याकडे बेल्जियममधील वरिष्ठ न्यायालयात या निर्णयाविरुद्ध दाद मागण्याचा पर्याय असणार आहे. चोक्सीने त्याचा पुतण्या नीरव मोदीशी संगनमत करून पंजाब नॅशनल बँकेत १३,००० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. ‘चोक्सीच्या प्रत्यार्पणाचे पहिले कायदेशीर पाऊल आता स्पष्ट झाले आहे,’ असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
या गुन्ह्यात ठोस युक्तिवाद करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि ‘सीबीआय’ अधिकाऱ्यांनी बेल्जियमच्या अभियोक्त्यांना मदत केली. ‘तो अजूनही पळून जाण्याचा धोका असून, त्याला तुरुंगातून सोडता येणार नाही,’ असे सरकारी वकिलांनी सांगितले.