तुषार कांबळे | हदगाव प्रतिनिधी | हदगाव (Hadgaon News) तालुक्यातील मनाठा येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) व मंडळ अधिकारी यांच्या नव्याने बांधलेल्या शासकीय कार्यालयाच्या इमारती आजही कुलूपबंद अवस्थेत पडून आहेत. शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या इमारतीच्या लोकार्पणास ‘मुहूर्त सापडला नाही’ हेच प्रशासनाचे एकमेव उत्तर आहे. परिणामी, महसूल विभागाचे कामकाज आजही खाजगी इमारतीतच सुरू असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी हे गावागावातील जमिनीचे नोंदवही, दाखले, प्रमाणपत्रे, वारस दावे अशा शेकडो कामांचे प्रमुख घटक आहेत. शासनाने नागरिकांच्या सुविधेसाठी सुसज्ज कार्यालयीन इमारत उभारली असली तरी, प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे ही इमारत आजही वापरात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या लोकार्पणाची सर्व तयारी काही दिवसांपूर्वी पूर्ण झाली होती पाणी, वीज, रंगकाम, फलक, साफसफाई सर्व झालेलं असतानाही, कार्यक्रम अचानक रद्द झाला. त्यानंतर मात्र इमारतीला कुलूप लागले. मनाठा परिसरातील नागरिकांचा प्रश्न आहे “शासनाचा पैसा खर्च करून बांधलेली इमारत धुळखात ठेवण्यापेक्षा, प्रशासनाने ती त्वरित कार्यान्वित करून लोकांसाठी खुली करावी.”
तलाठी कार्यालये खाजगी जागेत असू नयेत. महाराष्ट्र शासन, कार्यासन अधिकारी, मंत्रालय मुंबई पत्र क्र. दि. १९ ऑक्टोबर २०२४ या आदेशानुसार, महसूल कार्यालयाचे कामकाज खाजगी इमारतीत चालवणे किंवा खाजगी व्यक्ती मदतनीस म्हणून ठेवणे नियमबाह्य आहे. अशा ठिकाणी शासकीय दस्तऐवजांची सुरक्षा धोक्यात येते आणि गैरव्यवहारांची शक्यता वाढते. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर म.ना.से. (शिस्त व अपील) नियम १९७९ अन्वये कारवाई होऊ शकते.













