सांगली दि.२६ जानेवारी: सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात असलेल्या म्हैसाळ येथे एका हळदीच्या कार्यक्रमात क्षुल्लक कारणावरून 28 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून, आनंदोत्सवात रक्ताचा सडा पडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शुभम चव्हाण असे मृत तरुणाचे नाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम उर्फ सोन्या बाळासो चव्हाण (वय 28, रा. म्हैसाळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. शुभम हा आपल्या मित्राच्या हळदी समारंभासाठी गेला होता. यावेळी डीजेच्या तालावर नाचत असताना धक्का लागल्याच्या किंवा रागाने बघितल्याच्या कारणावरून काही तरुणांशी त्याचा वाद झाला.
नेमके काय घडले? हळदी समारंभात झालेला वाद काही वेळातच विकोपाला गेला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी चार ते पाच जणांच्या टोळक्याने शुभमला गाठले आणि त्याच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी (कोयता) सपासप वार केले. इतकेच नव्हे तर, हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या केली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कार्यक्रमात एकच खळबळ उडाली.
पोलीस तपास सुरू घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शुभमला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. किरकोळ वादातून थेट जीव घेतल्याने म्हैसाळ गावात भीती आणि संतापाचे वातावरण आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.













